केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचे नाव

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांचे नाव

भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन

नवी दिल्ली :

भाजप नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांना भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून फोन आल्याची सूत्रांची माहिती असून राणे यांना तातडीने दिल्लीत बोलवण्यात आल्याची माहिती आहे. नारायण राणे उद्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.

राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणे हे राज्यातला मराठा समाजातील मोठा चेहरा आहे.

त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राणे हे बराच काळ शिवसेनेत होते. तसंच त्यांना मुंबई महापालिकेतील खाच-खळगे माहिती आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंचा उपयोग होऊ शकतो.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार

मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 7 जुलैला होण्याची शक्यता असून 17 ते 22 नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. यात महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल, त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम आणि उत्तर प्रदेशचे सत्यदेव पचौरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा