आचरा पारवाडी प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन

आचरा पारवाडी प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन

आचरा पारवाडी ग्रामस्थांचा प्रसिद्धीपत्रकाद्वारे इशारा

मालवण

आचरा पारवाडी डोंगरेवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद होण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली नाही. तसेच प्रशासनातील काही अधिकारी या प्रकल्प मालकाशी हितसंबंध ठेवून आहेत की काय अशी दाट शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली असल्याने प्रशासनाबद्दद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खाडीतील या प्रकल्पामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने तौत्के वादळामुळे आलेले खारे पाणी शेतीत साचून जमिन खारपड झाली आहे. यामुळे पावसाळ्यात केलेली लावणीही पिकून नुकसान होत आहे. या साठी प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कुठलीही कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग पत्करणार असल्यासचे आचरा पारवाडी येथे जमलेल्या प्रकल्प विरोधी ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे जाहीर केले आहे.

यावेळी पारवाडी डोंगरेवाडी येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्या वैशाली कदम, रवींद्र बागवे,चंदू कदम, बापू कदम, सचिन दुखंडे, प्रदीप केळकर, विलास सक्रू ,विकास साटम, परशुराम शेट्ये, अर्जुन दुखंडे, बळीराम वायगणकर, कौस्तुभ केळकर, बाबू मुळ्ये आदी ग्रामस्थ उपस्थित होते. पारवाडी येथील कोळंबी प्रकल्प बंद करण्याबाबत प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार संबंधित खात्यामार्फत २३ एप्रिल यादिवशी तहसिलदार यांच्या उपस्थितीत बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील इ. उपस्थित होते.

२४ एप्रिल रोजी कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनविभाग तसेच दि. ०३ मे रोजी पतन विभाग यांच्या मार्फत पाहणी केली होती. बराच कालावधी उलटूनही ग्रामस्थांना कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही किंवा प्रकल्पावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसल्याचे ग्रामस्थ यावेळी म्हणाले. पारवाडी, डोंगरेवाडीतील जलस्त्रोत दिवस दिवस अधिक दुषित होत आहेत. तौत्केत शेती परीसरात शिरलेल्या पाण्याचा निचरा या प्रकल्पामुळे न झाल्याने जमिन खारपड होवून पावसाळ्यातील भातशेती पिवळी पडून शेतीचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर पावसाळा हंगाम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये पूरपरिस्थितीची भिती निर्माण झाली आहे. म्हणूनच या प्रकल्पाबाबत येत्या चार दिवसात कुठलीही कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग पत्करणार असल्यासचे ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे जाहीर केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा