अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी

अटल प्रतिष्ठान संचलित महिला समुपदेशन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी

कोरोना काळात हजारो व्यक्तींना समुपदेशनातून दिला मानसिक आधार

सावंतवाडी

अटल प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक सौ. अर्पिता वाटवे व सौ. नमिता परब यांनी जिल्हाधिकारी व तहिसलदार यांच्या सूचनेनुसार कोरोना काळामध्ये अडकून पडलेले खाणकामगार, मजूर तसेच संस्थात्मक विलगीकरणामध्ये असणाऱ्या व्यक्ती अशा सुमारे १५०० व्यक्तींना समुपदेशन केले व त्यांना मानसिक आधार दिला आहे. अशा शासनमान्य उपक्रमामुळे कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य लाभण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सावंतवाडी केंद्रातील समुपदेशकांनी तसेच संस्था चालकांनी कोरोना काळात कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

डिजिटल क्रांती व समाजमाध्यमांचा अतिवापर, भौतिक सुखाच्या कल्पना आणि त्यामुळे बदलती सामाजिक परिस्थिती लक्षात घेता समाजामध्ये आणि विशेषत : अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद, कौटुंबिक कलह व हिंसाचारांच्या घटनांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालक विशेष सहाय्यता कक्ष आणि महिला समुपदेशन केंद्र सावंतवाडी येथे अटल प्रतिष्ठानने २०१४ पासून उपक्रम चालू केला आहे. सात वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून आलेली कौटुंबिक वादविवादाची व कौटुंबिक हिंसाचाराची सुमारे ४०० हून जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात समुपदेशन केंद्राच्या समुपदेशकांना यश आले आहे.

या उपक्रमामुळे ज्यांच्या संसारामध्ये कलह मिटून परिस्थिती पूर्ववत झाली आहे अशी अनेक दांपत्ये प्रत्यक्ष भेटून समुपदेशनाचे व संस्थाचालकांचे आभार मानतात. या कामामध्ये सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी व समुपदेशकांना कायदेशीर मार्गदर्शन करणारे अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांचा मोलाचा वाटा आहे.

अनेक प्रकरणांमध्ये सावंतवाडी पोलीस स्टेशनचे तत्कालिन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, शाशिकांत खोत व विद्यमान सहाय्यक पोलीस निरिक्षक सौ. स्वाती यादव यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. टोकाचे मतभेद निर्माण होऊन घटस्फोटापर्यंत गेलेल्या अनेक प्रकरणांना समुपदेशनाद्वारे व सुसंवादाद्वारे रोखण्यात समुपदेशन केंद्राला मोठे यश प्राप्त झाले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा