You are currently viewing वडपुजनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वडपुजनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रा.संजीवनी पाटील.

वैभववाडी.

मानव आणि पर्यावरणाचे अतूट असे नाते आहे. किंबहुना पर्यावरणाचा एक घटक म्हणून मानवाचे स्थानही महत्त्वाचे आहे. निसर्ग शक्तीला देव मानून पूजा करण्याची पद्धत रूढ झाली. वृक्षपूजा हे त्याचेच एक अंग आहे. वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करून वडाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक भाग आहे असे मत प्रा.संजीवनी पाटील यांनी व्यक्त केले.
माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक संस्थेच्यावतीने दि.२४ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त ‘वटपौर्णिमा : एक पर्यावरणीय उत्सव’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी प्रा.सौ.पाटील यांनी वटपौर्णिमेचा ऐतिहासिक संदर्भ देत वड औषधी वनस्पती असून संपूर्ण वनस्पतींमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. सात फे-यांबरोबरच सात पिढ्यांचे आरोग्य उत्तम राखण्या-या वडवृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. कारण तो अक्षयवट व संसारवृक्ष असून यज्ञ विधींमध्ये महत्त्वाचा आहे. अशा या बहुगुणी वटवृक्षाची पूजा करण्यापाठीमागे आपल्या पूर्वजांचा हेतू धार्मिक आणि वैज्ञानिक होता असे सांगितले.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने पर्यावरण आणि मानव यांचे नाते स्पष्ट होते. अशा सण, उत्सवांच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे. संस्थेच्या माध्यमातून भविष्यात असे विविध उपक्रम राबवणार असल्याचे अध्यक्षीय भाषणात श्री.प्रकाश भाऊ नारकर यांनी सांगितले. यावेळी श्री.जोशी, श्री.अरुण वाघमारे व डॉ.विजय लाड यांनी मनोगते व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या ऑनलाईन व्याख्यानाला संस्थेचे पदाधिकारी, निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले. वक्त्यांची ओळख सदस्य डॉ.गणेश मर्गज यांनी करून दिली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा