सार्वजनिक बांधकाम की सार्वजनिक भष्ट्राचार विभाग

सार्वजनिक बांधकाम की सार्वजनिक भष्ट्राचार विभाग

पर्यटन व्यावसायिक डि.के. सावंत यांचा संतप्त सवाल

भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कामे रेंगाळल्याचा आरोप

सावंतवाडी
सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पाहून त्यांना सार्वजनिक भ्रष्टाचार विभाग म्हणून जाहीर करण्यास काहीच हरकत नाही. कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा परिणाम या खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होत नाही. त्यामुळे अनेक कामे रेंगाळली असल्याचा आरोप पर्यटन व्यवसायिक डी.के.सावंत यांनी केला आहे.
मळगाव घाटीत गेली पांंच वर्ष रस्त्याला तडे गेल्याने रस्ता कमकुवत झाला आहे. दरवर्षी झाडे पडतात, ठिक ठिकाणी रस्ता खचला, रेलींग तुटल्याने कार- मोटरसायकल दरीत गेल्या. त्याचा कसलाही परिणाम या खात्यावर झालेला नाही. मात्र, भर पावसात दरीच्या बाजूने कोसळलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू आहे. ऐरवी या रस्त्याबाबत लक्ष वेधले असता ‘रस्ता दुरुस्ती साठी निधी नसल्याचे कारण बांधकाम अधिकाऱ्याकडून मिळते मग आत्ता’ त्यांना दुरुस्ती साठी निधी कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

इतरवेळी निधी नसल्याच्या नावाने शंख नाद करणारे हे सार्वजनिक बांधकाम अधिकारी अशा कामांसाठी मात्र ‘इमर्जंसी निधी’ असे उत्तर त्याच्याकडून देण्यात येते. घाट कोसळणार हे माहीत असताना व उन्हाळ्यात काम करणे सोयीस्कर असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन आता पावसाळ्यात काम करुन त्यात भ्रष्टाचार करण्याचा डाव अधिकाऱ्यांनी आखल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सावंतवाडी पोलिस वसाहत, आंबोली रेस्ट हाऊस, आंबोली घाट रस्ता, बांदा – दोडामार्ग रस्ता, बांदा पोलिस वसाहत, अनेक पुल व रस्ते, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आदीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. बांदा- दोडामार्ग हा राज्य मार्ग फक्त कागदावरच आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा पाहून, अनेक आंदोलने करूनही या अधिकाऱ्यांना फरक पडत नाही. रस्त्याला गटारं नाहीत.
त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी पाहून रस्त्याची नदी असा प्रश्न पडतो कोकणातील जनता थंड प्रवृत्तीची आहे. परंतु याचा गैरफायदा अधिकारीवर्ग उठवत असल्याचा आरोपही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा