जुनं ते सोनं

जुनं ते सोनं

सूर्योदयापूर्वी उठून,
पहाटेपासून राबायचं.
तेव्हा कुठे दोन वेळ,
खाल्लेलं अन्न पचायचं.

दारात होई शेणसडा,
त्यावर रांगोळी नक्षीदार.
तुळशी वृंदावनासमोर,
नतमस्तक सुवासिनी नार.

ना अंगात शर्ट सदरा होता,
नवे कपडे फक्त सणाला.
उघडे अंग भिजे घामाने,
तरी लाज न वाटे मनाला.

नसे कर्ज ना बडेजाव,
चारचौघात मिळे मान.
दिवसभर कष्ट करून,
झोप लागत होती छान.

दूरदर्शन दूरध्वनी दोन्ही,
माणसं जवळ आणतात.
सगेसोयरे नातेवाईकांच्या,
भेटीपासून मात्र दुरावतात.

शिक्षण कमी असले तरी,
वर्तनाने सुशिक्षित वाटायचा.
आचार विचार सदाचार हेच,
अंगावरचे दागिणे मानायचा.

नव्या नवलाईत हरवले दिस,
तरी जुनं ते सोनं आजही वाटे,
नव्याच्या सुखापेक्षा कधीकधी,
जुन्याचं मळभ मनावर दाटे.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा