You are currently viewing चक्रीवादळ कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी 1 हजार 482 कोटी निधीची मागणी

चक्रीवादळ कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी 1 हजार 482 कोटी निधीची मागणी

जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके; जिल्हा खनिकर्म निधीमधून 2 रुग्णवाहिका

पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टी, कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरणाची घेतली बैठक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीबाबत सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून साधनसामग्री सज्ज ठेवावी. प्रत्येकी 20 जणांची एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात आज दाखल होतील. त्याचबरोबर आरोग्य विभागाने कोविड 19 च्या चाचण्या जास्तीत जास्त वाढवाव्यात, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी देतानाच जिल्हा खनिकर्म निधीमधून दोडामार्ग आणि रेडी या ठिकाणी दोन रुग्णवाहिका देण्याची अंमलबजावणी तात्काळ करावी असे निर्देश दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. सामंत यांनी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध, लसीकरण तसेच संभाव्य अतिवृष्टीबाबत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्यात होणाऱ्या कोविड 19 बाबतच्या चाचण्या या आणखी वाढवाव्यात. त्याचबरोबर आरोग्य विभागाने रुग्णांचे समुदपदेशन करावे, योगा, काढे अशांवरही भर द्यावा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राज्याच्या टास्कफोर्सशी कायम संपर्कात राहून उपचाराबाबत चर्चा करावी. म्युकरमायकोसीसबाबतही दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील रुग्णांचा मृत्यू जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे मृत्यू, रिकव्हरी दर, लसीकरणाची सद्यस्थिती, प्राप्त लसीकरण, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचाही यावेळी त्यांनी आढावा घेतला. 200 केव्ही जनरेटर बसविण्याची सूचनाही त्यांनी केली.

            वैभववाडी येथील नळपाणी पुरवठा प्रस्ताव मार्गी लावण्याबाबत सूचना करून पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, जिल्हा नियोजनमधून ज्या नगरपालिकांना निधी देण्यात आला आहे, त्याबाबत सद्यस्थिती काय आहे याची माहिती नगर पालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी द्यावी. एसडीआरएफमधून जिल्ह्याला आणखी रुग्णवाहिका मिळणार आहेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तर आणि मुख्यालयस्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष, साधनसामग्री सुस्थितीत राहील याची दक्षता घ्या. कोरोना रुग्णालयाच्या ठिकाणी इंधनसाठ्यासह जनरेटरची सोय ठेवा. महामार्ग आडला जाणार नाही, याबाबतही सतर्क रहा, असेही ते म्हणाले.

चक्रिवादळ कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी 1482.159 कोटीची मागणी

            कोकणकिनाऱ्यावर आदळणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.

            धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी 400.70 कोटी, चक्रीवादळ प्रवण भागात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 1057.030 कोटी, वीज अटकाव यंत्रणा उभारण्यासाठी 1.67 कोटी, पूर्वसूचना प्रणाली बसवण्यासाठी 0.235 कोटी, शाळांमध्ये चक्रीवादळ प्रतिरोधक निवारे उभारण्यासाठी 17.52 कोटी, दरड प्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी 5.004 कोटी अशी एकूण 1482.159 कोटीची मागणी करण्यात आली आहे.

            खासदार श्री. राऊत यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्याकराव्यात आणि लवकरात लवकर उपचार पद्धती अमलंबजावणी. या उपचार पद्धतीत आणखी कसा सकारात्मक बदल करता येईल याबाबतही राज्याच्या वरिष्ठ टास्कफोर्स बरोबर चर्चा करावी. ज्या गावांमध्ये जास्त बाधीत रुग्ण सापडत आहेत. त्या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करावे. ग्राम समित्या सक्रीय करा, असेही ते म्हणाले.

            बैठकीनंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण येथील स्मशानभूमी येथे उभारण्यात येत असलेल्या सेमी विद्युत दाहिनीच्या कामाची पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =