You are currently viewing चिक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे…

चिक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे…

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

अग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसेच लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तिव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच सदरच्या वादळाचा परिणाम दि. 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावर ही होण्याची शक्यता आहे. तसेच 15 व 16 मे रोजी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या. चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

            यावेळी बोलतना जिल्हाधिकारी यांनी तालुका स्तरीय अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना देऊन पुढे म्हणाल्या की, मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल्स यांचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी नियोजन करण्यात यावे. नागरिकांचे स्थलांतर करावयाचे झाल्यास त्यासाठी निवारा केंद्राचे नियोजन करावे, किनारपट्टीच्या सर्व तालुक्यांमधील शोध व बचाव पथके तैनात करण्यात यावीत. जिल्ह्यात होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत रहावा या दृष्टीने मुसळधार पावसामुळे झाडे पडल्यामुळे रस्ते बंद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. झाडे पडल्यास ती तात्काळ दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा तयार ठेवावी, विशेषतः घाट रस्त्यांमध्ये पथके तैनात राहतील असे पहावे. घाट पूर्णवेळ सुरू राहतील याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

            भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात दि. 15 ते 18 मे याकाळात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. याकाळात दक्षिण कोकणामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. दिनांक 15 वते 17 मे 2021 या कालावधीमध्ये जिल्ह्यात विजांच्या कडकडाट, वेगवान वारे यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याच्या वेगामध्ये ताशी 60 कि.मी. पर्यंत वाढ होण्याची ही शक्यता आहे. 15 मे रोजी वाऱ्याचा वेग 70 कि.मी. पर्यंत वाढू शकतो असेही या इशाऱ्यामध्ये सांगितले आहे. त्याशिवाय 15 ते 18 मे दरम्यान समुद्र खबळलेला राहणार आहे. समुद्रामध्ये व किनाऱ्यावर याकाळात मोठ्या लाटा निर्माण होणार आहेत. त्या अनुषंगाने मच्छिमारांनी याकाळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. वादळाची दिशा आणि वेग यावर प्रशासनाने लक्ष द्यावे. बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे अशा सूचनही या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. या बैठकीस मुख्या कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =