You are currently viewing शिक्षकांचे लसीकरण व सुरक्षेची काळजी न घेताच दारोदारी सर्वेक्षणाची जबाबदारी?

शिक्षकांचे लसीकरण व सुरक्षेची काळजी न घेताच दारोदारी सर्वेक्षणाची जबाबदारी?

सर्वेक्षण गरजेचे पण आरोग्य कवच?

संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली, कित्येकांचे जीव गेले. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण राज्यात प्रथम क्रमांकाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राहिले होते. असे असताना जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेने त्याची कारणे देखील शोधली नव्हती. अखेर रुग्णसंख्या आणि मृत्युदर यांचे प्रमाण लक्षणीय वाढल्यानंतर तसेच मिडियामधून आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर जागृत झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी मृत्यूची आणि रुग्णसंख्या वाढीची कारणे शोधण्यास सुरुवात केली. त्यातूनच जिल्हाभर घरोघरी सर्वेक्षण करून रुग्ण तपासणी करण्याचा पर्याय पुढे आला. परंतु नेहमीप्रमाणे घरोघरी सर्वेक्षणासाठी कोणाला पाठवायचे हा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक सर्वेक्षण असो वा मतदान शिक्षक हा एकमेव पर्याय समोर असतो त्याप्रमाणे शिक्षकांवर घरोघरी फिरून कोविड-१९ च्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली.
वाढत्या कोविड-१९ च्या प्रभावामुळे सर्वेक्षण करणे ही काळाची गरज बनली. शाळा वर्षभर बंदच राहिल्याने शिक्षकांवर ही जबाबदारी आपोआपच आली. परंतु घरोघरी कोरोना रुग्ण तपासणी, सर्वेक्षण करणे म्हणजे फ्रंट लाईन वर्कर ची जबाबदारी होय.. शिक्षकांनी ती निभावणे देखील योग्य आहे, परंतु शासनाने या लढ्यात घरोघरी फिरणाऱ्या शिक्षकांना कोविड लस प्राधान्याने दिली आहे का?
कोरोनाच्या लढ्यात उतरणाऱ्या शिक्षकांना विमा कवच दिले आहे का? शासनाच्या दि.५/४/२१ आणि १३/४/२१ च्या आदेशात देखील फ्रंट लाईन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याचे म्हटले आहे. परंतु प्रतिबंधात्मक लस शिक्षकांना देण्यात आली नाही परंतु जबाबदारी मात्र प्राधान्याने देण्यात आली.
प्रशासनाने कोरोना लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला प्राधान्याने दोन्ही लसी देण्यात आल्या, मग शिक्षकांबाबत दुजाभाव का? शिक्षकांचे देखील घरदार, कुटुंब आहे. दिवसभर शेकडो लोकांच्या दारावर ते फिरणार, ऑक्सिजन लेवल तपसण्याकरिता अनेकांशी जवळचे संपर्क येणार, अशावेळी एखादा कोरोना रुग्ण असेल आणि कोरोनाबधितांशी संपर्क झाल्यावर शिक्षकांना देखील कोरोना होण्याची भीती आहे, पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा देखील धोक्यात येईल. शासनाकडे सर्व फ्रंट लाईन वर काम करणाऱ्या शिक्षकांची यादी आहे. रेल्वे स्टेशन, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कोरोना कक्ष, सर्व आरोग्य केंद्र, आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक हे सर्व फ्रंट लाईन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. देशावरील, राज्यवरील संकटात शिक्षकांनी नक्कीच जबाबदारी पार पाडली पाहिजे, परंतु वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंट लाईन वर्करना ज्याप्रमाणे प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस दिली जाते, विमा कवच दिले जाते, त्याप्रमाणेच रेल्वे स्थानक, तहसील ऑफिस, घरोघरी सर्वेक्षण करणाऱ्या आदी शिक्षकांना शासनाने प्राधान्याने प्रतिबंधात्मक दोन्ही लस द्याव्यात. अन्यथा वैद्यकीय क्षेत्राचा आणि कोरोना काळात काय काय खबरदारी घ्यावी याची खोलवर माहिती नसलेले शिक्षक कोरोनाचे शिकार होण्यास वेळ लागणार नाही.
प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचे बळी उच्च श्रेणी मुख्याध्यापक लवू चव्हाण हे पडले असून अजून काही शिक्षक बाधित झाले आहेत. प्रशासनाने कोरोनावर मात करण्याकरिता योग्य पावले उचलावीत परंतु शिक्षकांच्या जीवावर उदार होऊन नव्हे तर त्यांच्या जीवाची आणि त्यांच्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + fifteen =