You are currently viewing रुग्णसेवेचा मुख्यस्तंभ….परिचारिका..

रुग्णसेवेचा मुख्यस्तंभ….परिचारिका..

परिचारिका दिन विशेष.

विशेष संपादकीय…..

वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक कर्मचारी हा त्या विभागाचा अविभाज्य घटक असतो. त्यातीलच एक महत्वाचा मानला जाणारा आणि डॉक्टर पेक्षाही रुग्णांच्या जवळ असणारा, त्यांची काळजी वाहणारा महत्वाचा घटक म्हणजे परिचारिका. १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून पाळला जातो. इ.स.१८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करत फिरणारी परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस. फ्लॉरेन्स ह्या आधुनिक सुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजल्या जातात. रुग्णसेवेतील परीचारिकांचा सन्मान करण्यासाठीच परिचारिका दिवस साजरा करण्यात येतो.
कोणत्याही रुग्णालयात रुग्ण हा डॉक्टर पेक्षाही जास्त काळ परिचरिकांच्या देखरेखीखाली असतो. त्यांची सुश्रुषा, काळजी, त्यांना वेळेत औषधे देणे आदी सर्व कामे परिचारिका करत असतात, त्यामुळे रुग्ण आणि परीचारिकांचे अगदी जवळचे नाते बनते. आपल्या घरची व्यक्ती असल्यासारखीच परिचारिका रुग्णांची सेवा करतात. आपल्या स्वतःच्या वृद्ध आई वडिलांची सेवा करण्यासाठी एखादा केअरटेकर ठेवण्याच्या आजच्या युगात परिचारिका करत असलेली सेवा ही श्रेष्ठच होय. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करताना त्यांना धीर देत त्यांच्यात सकारात्मकता आणणे, रोगाविरुद्ध लढण्याचे बळ त्यांच्यात निर्माण करणे, आणि रुग्णाला रोगाला विसरून आनंद देण्याचे काम परिचारिका चोखपणे बजावतात.
आज नव्याने दाखल झालेल्या कोरोनाच्या महामारीत परीचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. दिवसभर अंगावर पीपीई किट घालून, हातात हॅन्डग्लोज घालून केवळ डोळे उघडे राहतील असा बंद पेहराव करून रुग्णसेवा देणे हे आजच्या गर्मीच्या दिवसात म्हणजे अत्यंत कठीण काम. पाच मिनिटे वीज गायब झाल्यावर होण्याऱ्या उष्णतेमुळे वीज मंडळाला लाखोली वाहणारे आपण दिवसभर प्लास्टिकच्या पीपीई किटमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना सलाम केलाच पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाची, मुलांची आणि प्रसंगी आपली काळजी न करता अहोरात्र रुग्णसेवा देत परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेकवेळा आपल्या कर्तव्यामुळे त्यांना स्वतःच्या घरी देखील जाता येत नाही. त्यामुळे परीचारिकांचे आजच्या कोरोनाच्या महामारीतील योगदान अमूल्य आहे. परीचारिकांशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जातंच नाही.
कोरोनाच्या काळात अगदी पहिल्या दिवसापासून डॉक्टरांसोबत परिचारिका देखील चोखपणे आपलं कर्तव्य बजावत आहेत. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात सुश्रुषा करत रुग्णसेवा बजावणाऱ्या परिचारिकांना संवाद मिडियाकडून मानाचा मुजरा आणि रुग्णसेवा बजावताना स्वतःच्या प्राणांची देखील आहुती देणाऱ्या परिचारिकांना भावपूर्ण आदरांजली.

प्रतिक्रिया व्यक्त करा