You are currently viewing जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणार: मनिष दळवी

जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणार: मनिष दळवी

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

कर्ज देणे आणि कर्जाची वसुली करणे एवढ्या पुरतीच बँकिंग कामकाजाची व्याप्ती न मानता सामाजिक जाणवेपोटी जिल्हा बँक दुग्ध व्यवसायिक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करीत असुन शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं काम जिल्हा बँक सातत्याने करीत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले ते बांदा येथे दुग्ध व्यवसायिक संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांदा पंचक्रोशी दुग्ध संस्थेचे संस्थापक प्रमोद अळवणी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय मनीष दळवी व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान चे प्रसाद देवधर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. प्रसाद देवधर यांनी शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपणच सक्षम बनले पाहिजे असे सांगुन जिल्ह्यात बायोगॅसचे प्रकल्प उभारणीसाठी मोठा वाव असून यासाठी जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान सर्वतोपरी मदत करत करणार असल्याचे सांगितले. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा साधता येईल याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित दुध व्यवसायिक शेतकऱ्यांनी आपल्या व्यवसायात उद्भवणाऱ्या विविध प्रश्नां बाबत चर्चा केली. व त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुन चांदेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगून दुग्ध उत्पादना बरोबरच गोमुत्रापासून शाम्पू, गोनाईल, औषधे, गोमयापासून पणत्या, गोमयमूर्ती अशा अनेक वस्तूंचा निर्मितीतून आपला आर्थिक फायदा करून घेता येईल असे सांगितले.

या चर्चासत्रात बांदा दुग्ध विकास संस्थेचे संस्थापक प्रमोद अळवणी, चेअरमन नारायण गायतोंडे, व्हाईस चेअरमन राजेश  पावसकर, देवी माऊली सहकारी दुग्ध संस्था पडवे माजगाव सचिव उदय देसाई, बांदेश्वर दुग्ध संस्था बांदा चेअरमन नारायण शिवराम गावडे तसेच दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समीर पेळपकर यांनी केले तर श्री. नारायण गायतोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा