You are currently viewing फोंडाघाट प्रा. आरोग्य केंद्राला ऍम्ब्युलन्स प्रदान

फोंडाघाट प्रा. आरोग्य केंद्राला ऍम्ब्युलन्स प्रदान

तालुक्यात मिळाल्या 2 ऍम्ब्युलन्स ; सभापती मनोज रावराणे यांनी मानले आभार

कणकवली

फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून प्राप्त विकासनिधीतून नवीन ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे. ऍम्ब्युलन्स मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ वैद्यकीय सेवा मिळणे सहज शक्य होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी फोंडाघाट प्रा. आरोग्य केंद्राला ऍम्ब्युलन्स प्रदान केल्याबद्दल पं. स.सभापती मनोज रावराणे, पं स सदस्या तथा माजी सभापती सुजाता हळदीवे – राणे यांनी आमदार नितेश राणे , जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांचे आभार मानले आहेत. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रात फोंडाघाटसह दशक्रोशीतील लोरे, घोणसरी, हरकुळ ( खुर्द ) वाघेरी,लोरे नं 1 आदी अन्य गावांचा समावेश आहे.

प.महाराष्ट्रकडून येत असताना जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि मुख्य बाजारपेठ असलेल्या फोंडाघाट साठी कायमस्वरूपी ऍम्ब्युलन्स मिळावी यासाठी आमदार नितेश राणे यांच्याकडे विद्यमान पं स सभापती मनोज रावराणे, पं स सदस्य तथा माजी सभापती सुजाता हळदीवे-राणे यांनी पाठपुरावा केला होता. आमदार नितेश राणे यांनी लवकरच फोंडाघाटसाठी ऍम्ब्युलन्स देण्याचा शब्द दिला होता. आमदार नितेश राणे यांनी आपली शब्दपूर्ती करत फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. कणकवली तालुक्यात फोंडाघाटसह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रालाही ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे. ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना तात्काळ पुढील उपचार मिळण्यासाठी फायदा होणार आहे. याबाबत फोंडाघाट व खारेपाटण दशक्रोशीतून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा