You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्युदर वाढले?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्युदर वाढले?

जिल्हा रुग्णालयाचे “डेथ ऑडिट” सुरू.

विशेष संपादकीय….

कोविड-१९ च्या वाढत्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या सावटाखाली वावरत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा उत्तमरीत्या कार्यरत असूनही जिल्ह्यातील कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाने सुरुवातीपासून कोरोनाचा विषय गंभीरपणे घेतला असता तर जिल्ह्याची परिस्थिती आज एवढी गंभीर झाली नसती. सोशल मीडियावरून संवाद मीडियाने देखील जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत आणि होणाऱ्या वाढत्या मृत्यूला आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा कारणीभूत असल्याचे म्हटले होते. मुळातच कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर चार दिवसांनी रुग्ण RTPCR टेस्ट करतात व रिपोर्ट येईपर्यंत तून चार दिवस जातात, तोपर्यंत रुग्ण उपचाराविना केवळ तापाच्या गोळ्या घेऊन घरीच राहिल्याने रुग्णसंख्या आणि मृत्युदर वाढतात हे सत्य आरोग्य प्रशासनाला मिडियामधून दाखवून दिले होते. जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीनुसार डेथ ऑडिट मध्ये हे सत्य रुग्णालय प्रशासनाने देखील कबूल केले आहे. त्यामुळे गेले दीड दोन महिने प्रशासन उपचार करत होते, कर्मचारी, डॉक्टर्स आपापल्या परीने चांगले उपचार देत होते, परंतु मृत्युदर आणि रुग्णसंख्या का वाढते याचा कोणीही विचार करत नव्हते.

 

जिल्ह्यातील आमदार, पालकमंत्री, खासदार इत्यादींनी ऑक्सिजन पासून आवश्यक सुविधा जिल्ह्याला कमी पडू दिल्या नाहीत. रुग्णालयात डॉक्टर्स देखील उपलब्ध करून दिले, काही खाजगी फिजिशियन डॉक्टर्सनी देखील सेवा दिली, परंतु जिल्ह्याचा संपूर्ण भार ज्या रुग्णालयाच्या खांद्यावर आहे त्या जिल्हा रुग्णालयास गरज आहे ती पूर्णवेळ फिजिशियन डॉक्टरची. पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी आपले वजन वापरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत माहिती देऊन पूर्णवेळ फिजिशियन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच जिल्ह्यातील गंभीर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल आणि मृत्युदर कमी होतील.
महाराष्ट्रात जिल्ह्याचा कोरोना रुग्ण मृत्युदर हा प्रथम क्रमांकावर होता ही जिल्ह्यासाठी लाजिरवाणी गोष्ट होती. त्यामुळे जिल्हाशल्यचिकित्सक यांनी डेथ ऑडिट करून गोंधळलेल्या आरोग्य यंत्रणेला कारणमिमांसा करण्यास सांगितले. त्यातून बरेच रुग्ण आजार अंगावर काढतात व त्यांना असलेले बहू आजार यामुळे रुग्ण गंभीर बनतात. त्यामुळे लक्षणे आढळणाऱ्या रुग्णाची तपासणी टेस्ट करून पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेतल्याने मृत्युदर कमी होताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील काही लोक खाजगी रुग्णालयात उपचार घेतात आणि खाजगी रुग्णालयात योग्य ती औषधे, इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने ते गंभीर बनतात आणि शेवटच्या क्षणी जिल्हा रुग्णालयात धाव घेतात, अशावेळी व्हेंटिलेटरवर ठेवण्याची परिस्थिती येते आणि आधीच गंभीर बनलेले काही रुग्ण दगावतात. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये जाताना देखील लोकांनी सरकारी यंत्रणेवर भरवसा ठेवला पाहिजे, सरकारी रुग्णालयात रेमडेसीविर सारखी इंजेक्शन गरजेनुसार उपलब्ध असतात जी बाहेर मिळणे मुश्किल होतात, परिणामी खाजगी रुग्णालयात उपचार होण्यास विलंब होतो. जिल्हा सरकारी रुग्णालयात अतिशय चांगले उपचार होत असल्याने जिल्हावासीयांनी घरात राहून गंभीर होण्यापेक्षा रुग्णालयात दाखल होऊन योग्य ते उपचार घेतले जर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आणि मृत्युदर कमी होऊन जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =