You are currently viewing ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’..

‘नो मराठी, नो अॅमेझॉन’..

अॅमेझॉनवर मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी ‘मराठी नाही तर अॅमेझॉन नाही’ असे ठणकावत मनसेने सणसणीत पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी या मागणीवरून मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत अॅमेझॉनचं कार्यालय व वेअरहाऊसवर धडक देत तोडफोड केली. त्यामुळे अॅमेझॉनने हा विषय अधिक न वाढवता मनसेची मागणी मान्य करण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अॅमेझॉनची वेबसाइट व मोबाइल अॅपवर येत्या सात दिवसांत मराठी झळकणार असून तसे आश्वासन अॅमेझॉनने दिल्याचे मनसे नेते सांगत आहेत. दरम्यान, अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही माफी मागायला हवी, अशी भूमिका मनसेने घेतली असून आज मनसे नेते आणि अॅमेझॉन व्यवस्थापनातील अधिकारी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा होणार असल्याचे कळते.

मनसे आणि अॅमेझॉन कंपनी यांच्यात मराठीवरून गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अॅमेझॉनवर इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेलाही स्थान असायला हवे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातूनच ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’, असे फलक मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही उघडली आहे. तर दुसरीकडे अॅमेझॉनच्या अनेक फलकांनाही मनसेने लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने मनसे विरुद्ध मुंबईतील दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. अॅमेझॉनच्या याचिकेवरून न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अॅमेझॉनच्या कामात मनसेने कोणताही अडथळा आणू नये. मनसेवर अॅमेझॉनने जे आरोप केले आहेत त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राज यांनी ५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावे, असेही नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी या नोटिसा बजावण्यात आल्या असताना शुक्रवारी त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + ten =