You are currently viewing जगावरील संकट टळले…

जगावरील संकट टळले…

चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर हिंद महासागरात कोसळले

चीनचे अनियंत्रित रॉकेट ‘लाँग मार्च 5 बी’ हे अखेर मालदीव बेटांच्या पूर्वेला हिंद महासागरात कोसळले. रविवारी सकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी हे रॉकेट कोसळले, अशी माहिती ‘चायना नॅशनल स्पेस एडमिनीस्ट्रेशन’ने दिली आहे. यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

चीनच्या अवकाश धोरणाचा भाग असलेले ‘लाँग मार्च 5 बी’ हे अवकाशात सोडलेले रॉकेट जगासाठी मोठे संकट ठरले होते. या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याने ते जगाच्या कुठल्याही भागावर कोसळू शकत होते. 18 हजार मैल प्रतितास या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे झेपावणारे हे 21 टन वजनाचे रॉकेट जिथे कोसळेल तिथे विध्वंस होऊल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती.

100 फूट लांब आणि 16 फूट रुंद असणारे हे रॉकेट दक्षिणपूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरेबियन बेट, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनिझुएला, दक्षिण युरोप, दक्षिण-मध्य आफ्रिका, दक्षिण हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, न्यूयॉर्क, माद्रिद, दक्षिण चिली, वेलिंग्टन, न्यूझिलंडच्या भागात हे रॉकेट कोसळेल, असा अवकाश तज्ञांचा कयास होता. अखेर रविवारी सकाळी हे रॉकेट हिंदुस्थानच्या दक्षिण पश्चिम दिशेला असलेल्या मालदीव बेटांच्या पूर्वेला हिंद महासागरात कोसळले. पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करताच या रॉकेटचा मोठा भाग जळून खाक झाला आणि इतर भाग महासागरामध्ये कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, चीनने अवकाशात सोडलेल्या अनियंत्रित रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. गेल्यावर्षी मेमध्येच चिनी रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कोसळले होते. मात्र, ते अटलांटिक महासागरात पडल्याने कुठलीही हानी झाली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा