You are currently viewing नाम.नारायण राणे यांची सावंतवाडीच्या गांधी चौकात जाहीर सभा

नाम.नारायण राणे यांची सावंतवाडीच्या गांधी चौकात जाहीर सभा

*शिवसेना शहराध्यक्ष खेमराज उर्फ बाबू कुडतरकर एकटाच आघाडीवर*

सावंतवाडी :

 

लोकसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना सावंतवाडीच्या गांधी चौक येथे सावंतवाडीचे नाम.दीपक केसरकर यांनी नाम. नारायण राणे यांच्या प्रचारासाठीची जाहीर सभा आयोजित केली असून सभेची तयारी जोरदार सुरू आहे. सभा सुरू असताना उपस्थित मतदारांना उन्हाच्या झळा बसू नये म्हणून सभेच्या ठिकाणी हिरव्या कापडाचे आच्छादन घातले असून बैठक व्यवस्था करण्याची तयारी सुरू आहे. नामदार नारायण राणे यांची जाहीर प्रचार सभा म्हटल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी अपेक्षित अशी तयारी करतील अशी आशा वाटत होती, परंतु नाम.दीपक केसरकर यांनी सभेचे आयोजन केल्याने केसरकारांचे समर्थक सावंतवाडी नगरपालिकेतील मागील निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि शिवसेना शहराध्यक्ष खेमराज उर्फ बाबू कुडतरकर हे निवडक कार्यकर्त्यांसमवेत बैठक व्यवस्था लावण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे महायुतीच्या या प्रचार सभेची जबाबदारी केवळ शिवसेनेने खांद्यावर घेतली असे चित्र सावंतवाडीच्या गांधी चौकात दिसत आहे.

खेमराज उर्फ बाबू कुडतरकर हे शिवसेनेचे मागील नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाम.नारायण राणे समर्थक व काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या विरोधात निवडणूक लढवीत असताना अवघ्या काहीच मतांनी बाबू कुडतरकर यांचा पराभव झाला होता. परंतु राजकारणात जय पराजय हे सर्वांच्या वाटेला येतात, त्यामुळे त्या पराभवाचे शल्य मनात न ठेवता नाम.दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडीच्या गांधी चौकात आयोजित केलेल्या नाम.नारायण राणे यांच्या प्रचार सभेसाठी बाबू कुडतरकर स्वतः मैदानात उतरून भर उन्हात खुर्च्या लावण्यापासूनचे काम करत असल्याचे दिसून आले. बाबू कुडतरकर यांना काम करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या परंतु या ठिकाणी भाजपाचा एकही पदाधिकारी सभेच्या तयारीसाठी उपस्थित नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आपले नेते आल्यानंतर केवळ त्यांच्या समवेत फोटोसेशन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पुढे असतात, परंतु त्याच नेत्याच्या सभेच्या तयारीसाठी मात्र उन्हातान्हात राबताना कोणीही स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ता दिसत नसल्याने आश्चर्य वाटणे स्वाभाविकच आहे. आपल्या नेत्यांचा आदेश शिरसावंद्य मानून महायुतीचा धर्म म्हणून युतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांच्या सभेची तयारी करणारे बाबू सारखे कार्यकर्ते विरळच..!

प्रतिक्रिया व्यक्त करा