ऑक्सीजन प्लांटला लागलेल्या आगीमुळे होणारा स्फोट नर्सच्या प्रसंगावधानामुळे टळला…

ऑक्सीजन प्लांटला लागलेल्या आगीमुळे होणारा स्फोट नर्सच्या प्रसंगावधानामुळे टळला…

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची माहिती

मालवण

ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांट मध्ये काल मध्य रात्री आग लागल्याची घटना घडली आहे.याची माहिती मनसेकडे असल्याचे मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले. सदरील ऑक्सीजन प्लांटला लागलेली आग तेथे असलेल्या नर्सच्या प्रसंगावधानामुळे वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले आहे. नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सीजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल जिल्हा रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्गातही ऑक्सीजन प्लांटवर तंत्रज्ञाची नियुक्ती करा अशी मागणी काही दिवसापूर्वी केली होती. मनसेने आगावू सूचना देवूनही आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजूनही ऑक्सीजन प्लांटवर तंत्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. काल नर्सने आग आटोक्यात आणली नसती तर अनेक जण मुत्यूमुखी पडले असते. राज्याच्या आरोग्य संचालिका श्रीमती साधना तायडे या कालपासून जिल्हा दौर्‍यावर आहेत. तायडे मॅडम कायमस्वरूपी जिल्हाशल्यचिकित्सक या जिल्ह्याला देतील का? सध्या प्रभारी असलेल्या श्रीपाद पाटलांना ओरोस येथेच पूर्णवेळ थांबण्यास सांगतील का? तसेच त्यांच्याकडून सिंधुदुर्गातील आरोग्य विभागाची झाडाझडती होणे अपेक्षित आहे. तसेच आरोग्य यंत्रणेच्या एकूण कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे. आग लागल्यामुळे किती रुग्णांचे ऑक्सीजन बंद पडले? त्यामुळे काही रुग्ण दगावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑक्सीजन अभावी किती रुग्ण दगावले याचीही चौकशी व्हावी. अन्यथा मुंबई, नाशिक, विरारसारखी गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गातही उद्भवू शकते अमित इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा