You are currently viewing कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढीचा निर्णय, राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध

कॅबिनेट बैठकीत लॉकडाऊन वाढीचा निर्णय, राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध

मुंबई

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यात, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, हा लॉकडाऊन आता वाढविण्यात आला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारायला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. त्यामुळे, 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा लॉकडाऊन किती दिवसांसाठी वाढविण्यात येईल, याचा तपशील लवकरच जाहीर होईल. पण, तो 15 दिवसांसाठी वाढविण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, राज्यात 15 मे पर्यंत पुन्हा कडक निर्बंध लागू असतील, असेच दिसून येते.

वडेट्टीवार यांनीही दिले होते लॉकडाऊन वाढीचे संकेत

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

जयंत पाटील यांनी दिले होते संकेत

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना त्यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरणात्मक उत्तर पाटील यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + fifteen =