लॉकडाऊनमध्येही तळीरामांची चंगळ

लॉकडाऊनमध्येही तळीरामांची चंगळ

फेसबुकवरून होतेय दारूची विक्री..

 

अनेकजण कोरोना नियम धाब्यावर बसवून अन्य पद्धतीनं आपले व्यवसाय सुरू ठेवत असल्याच्या अनेक  घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशातच कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात सर्व ठिकाणी दारुची दुकानं बंद असल्याने अनेकांना आपला घसा ओला करता येत नाही. तर काही ठिकाणी मद्यांच्या किंमती वाढवून दुप्पट दराने विक्री केली जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

ज्यामध्ये एका व्यक्तीने दारूची विक्री करण्यासाठी थेट फेसबुकचा  वापर केला आहे. ही घटना पुण्यातील हडपसर येथून समोर आली आहे.  त्याने फेसबुकवर दारू विक्रीबाबत पोस्ट टाकून आपला जाहिरातबाजीही केली आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी सापळा रचून आरोपी युवकाला अटक  केली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी त्याच्याकडून दारूच्या काही बाटल्यांसहित अन्य वस्तूंचा साठाही जप्त केला आहे. संबंधित आरोपी विरोधात मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी सांगितलं की, पुण्यातील हडपसर परिसरात फेसबुकच्या माध्यमातून दारू विक्री होतं असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर संबंधित जाहिरात कोणी दिली, याची खातरजमा करून जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधला आणि दारुची पाहिजे असल्याची बतावणी केली. त्यानंतर समोरील व्यक्तीनं हडपसर परिसरातील गाडीतळ याठिकाणी दारु देतो, असं सांगितलं.

यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपी तरुणाला अटक केली आहे. दरम्यान त्याच्याकडून 28 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी राजीव अग्रवाल हा 180 मिलिलिटरची बाटली फेसबुकच्या माध्यमातून दुप्पट दराने विकत होता. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा