You are currently viewing संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर रविवारी सह्याद्री वाहिनीवर

संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर रविवारी सह्याद्री वाहिनीवर

‘विचारांच्या पलीकडले’ मध्ये होणार मुलाखत

तळेरे
कणकवली तालुक्यातील मुळचे साळिस्ते येथील असलेल्या संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या संग्रहाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या वाहिनीवर प्रसारित होणार्या “विचारांच्या पलीकडले” हा रविवारी, 18 एप्रिलला सायंकाळी 7.30 वा. कार्यक्रम प्रसारित होईल.

तळेरेसारख्या ग्रामीण भागात राहून गेल्या 14 वर्षांपासून निकेत हा संग्रह अत्यंत मेहनतीने आणि सातत्य ठेऊन जोपासला आहे. विशेष असे की, परदेशातील अनेक महनीय व्यक्तींची संदेश पत्रे भारतीय पोस्ट कार्डवर घेतली आहेत. या संग्रहात देश आणि परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविलेल्या 1500 व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे आहेत.

या संग्रहाच्या निमित्ताने दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील BEYOND THOUGHTS अर्थात विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमात मुलाखत दाखवली जाणार आहे. हा कार्यक्रम 18 एप्रिलला सायंकाळी 7.30 वा. व रात्रौ 10 वा. दाखविण्यात येणार आहे. या संग्रहाचे निकेत याने घरी अक्षर घर उभारले आहे. त्या अक्षरघराला अनेक नामवंत व्यक्तींनी भेट देऊन वेळोवेळी कौतुक केले आहे.

विविध ठिकाणी प्रदर्शने 
या संग्रहाची महाराष्ट्रात विविध ठिकाणी आणि बेळगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसादात प्रदर्शनेही झाली आहेत. विविध ठिकाणाहून प्रदर्शनासाठी त्यांना मागणी आहे. मात्र, विशेषत: शालेय मुलांनी हा संग्रह पहावा, असे निकेत पावसकर सांगतात. कारण, यातील संदेश तरुण पिढीने वाचले पाहिजेत, देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्यांनी हा संग्रह अनुभवला पाहिजे. त्यामधून निश्चितच एक वेगळी दिशा मिळू शकेल. निराश झालेल्यांन वेगळी वाट सापडू शकेल, असे आयुष्य आनंदी जगायला शिकविणारे संदेश या संग्रहात आहेत.

संदेश पत्र पोस्ट कार्डवरच का?
या संग्रहाचे निमित्त ठरलेले मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे पहिले पत्र साध्या पोस्ट कार्डवर आले. तसेच पोस्ट कार्ड जपून ठेवणे सहज सोपे असल्याने आणि आपली काहितरी वेगळी खासियत असावी यासाठी संदेश पत्र पोस्टकार्डवरच घेतली जातात.

अक्षरघराला यांनी दिली भेट 
तळेरे येथील या अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, फुटबॉल खेळाडू जयेश राणे, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, दिग्दर्शक दिपक कदम, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नेमबाज रोहिणी हवालदार, कवी प्रा. प्रदिप पाटिल, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, धीरज वाटेकर यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात 
निकेतच्या या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − seven =