कोविडच्या पार्श्वभूमीवर लायसन्ससाठी प्रतिदिनी फक्त 25 टक्केच अपॉईंटमेंट

कोविडच्या पार्श्वभूमीवर लायसन्ससाठी प्रतिदिनी फक्त 25 टक्केच अपॉईंटमेंट

सिंधुदुर्ग

कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये शिकाऊ तसेच पक्की अनुज्ञप्ती (लायसन्स)साठी प्रतिदिनी फक्त 25 टक्केच अपॉईंटमेंट स्वीकरण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत हे कळवितात.

तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुढील प्रमाणे सुरू राहणार आहे. कार्यालयातील शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी यांची संख्या 25 टक्के करताना दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत ज्या अनज्ञप्ती धारकांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतल्या असतील त्यातील पूर्वप्राधान्याने घेण्यात आलेल्या अपॉईंटमेंट व्यतिरिक्त इतर अपॉईंटमेंट रिशेड्युल करण्यात येतील. तरी अनुज्ञप्ती धारकांनी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी कार्यालयात येतेवेळी आपल्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा दिनांक व वेळ www.parivahan.gov.in या वेबसाईटवर खातरजमा करून त्या दिवशी कार्यालयात उपस्थित रहावे. कार्लायलयात वाहन संदर्भातील कामकाजाकरिता जसे की, वाहन हस्तांतरण, वाहन कर्ज बोजा उतरविणे व चढविणे या कामाकरिता ऑनलाईन अपॉईंटमेट ( स्लॉट बुकिंग) करून www.parivahan.gov.in या वेबसाईटवर ज्या दिवशी आपली अपॉईंटमेट असेल त्या दिवशी कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित रहावे.

शिकाऊ अनुज्ञप्तीची संगणकीय चाचणी घेताना पुढील प्रमाणे दक्षता घेण्यात येईल. 2 अर्जदारांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, कि बोर्ड, सॅनिटाईज करून घेण्यात येईल. अर्जदारास मास्क व हॅण्डग्लोव्हज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. कार्यालयात नागरिकांनी अनावश्यक कामकाजाकरिता गर्दी करू नये, कार्यालयात येणार्या नागरिकांनी योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पक्की अनुज्ञप्तीची चाचणी वाहन सॅनिटाईज केल्याची खातरजमा केल्यानंतरच करण्यात येईल. त्याच प्रमाणे पत्ती अनुज्ञप्तीची चाचणी मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या वाहनावर घ्यावयाची असल्यास एका उमेदवाराची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून घेतल्यानंतरच दुसऱ्या उमेदवाराची चाचणी घेण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा