राणीच्या बागेतील उगवत्या सुर्याने पैसे जमवून मिळवली अफाट संपत्ती.

राणीच्या बागेतील उगवत्या सुर्याने पैसे जमवून मिळवली अफाट संपत्ती.

कोण आहे हा आरटीओचा कलेक्टर?…

जीवाचे रान करूनही न मिळणारे वैभव, संपत्ती केवळ गैर मार्गानेच मिळते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे खाकी वर्दीच्या आरटीओच्या साहेब लोकांचे तिऱ्हाईत म्हणून पैसे गोळा करणारा, पहाटेच आपली सोनेरी किरणे घेऊन उगवणारा हळद लागलेला सूर्य. हापापाचा माल गपापा या म्हणीप्रमाणे हा उगवता हळद लागलेला सूर्य गेली २५ वर्षे आरटीओने अडवलेल्या गाड्यांची वसुली करत आहे.
आरटीओचे खाकी वर्दीतील साहेब असोत वा त्यांचे कनिष्ठ सहकारी हे स्वतः अडचणीत असणाऱ्या, ओव्हर लोड, कागदपत्रे अथवा परमिट, पास नसणाऱ्या गाड्यांकडून बेकायदेशीर पैसे घेऊ शकत नाहीत. घेतलेल्या दंडाची त्यांना आकारणी करून पावती द्यावी लागते. परंतु पावती दिलेली रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा होणार. अशावेळी एक नामी क्लुप्ती हे सरकारी अधिकारी राबवतात ती म्हणजे एखादा आपल्यासाठी राबणारा हळदीच्या सुर्यासारखा इसम नेमायचा आणि गाड्यांकडून भले जिथे हजार मिळतील तिथे ९०० रुपये मिळू दे, पण हात सुके आणि पाय सुके कोणतीही जोखीम न घेता पैसे आपल्या खिशात येणार अशी सोय करायची. अशाचप्रकारे गेली २५ वर्षे रस्त्यावर गाड्या तपासणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या गोवा सीमेवरील तपासणी नाक्यावर हा हळद लागलेला सूर्य नेमलेला आहे.
ऐश आरामात जीवन जगणाऱ्या या हळदीच्या सुर्याकडे गाड्यांचे हफ्ते गोळा करून साहेबांच्या नावावर घेतलेल्या पैशातील बरीचशी माया स्वतः लंपास करून साहेबांच्या हातावर तुरी देऊन अमाप संपत्ती गोळा झाली आहे. इन्सुलीत तर या सुर्याचा भला मोठा बंगला असून त्यात वेगवेगळ्या माशांसाठी फिश टॅंक, कुत्र्यांसाठी पिंजरे, पक्षी असे अनेक प्राणी त्याच्या बंगल्यात आहेत. त्यामुळे लोकांनी त्याच्या या राहत्या घराच्या परिसराला राणीची बाग असेच नाव दिले आहे. शायनर म्हणूनच त्याची ओळख आहे. हळदीचा सूर्य म्हणजे इन्सुलीतील शिमगोत्सवातील सेलेब्रिटी.
गाडी तपासणी करणाऱ्या खाकी वर्दीतील आरटीओ अधिकाऱ्यांचे पैसे वसुलीचे काम करणारा हा हळदीचा शायनर सूर्य रोखलेल्या गाड्यांच्या वसुलीतील रक्कमेतील हिस्सा आपल्याला ठेवतो एवढंच नव्हे तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर चे सुद्धा हफ्ते या सुर्याला सुरू आहेत. वेत्ये येथे दगडाची खाण असणारा एक “सिक्स वेळा” नामक खाण मालक ते आपला व्यवसाय बिनदिक्कत पणे सुरू रहावा, ओव्हरलोड गाड्या सहीसलामत सुटाव्या म्हणून या सुर्याची गोव्यात बडदास्त ठेवतो. त्यामुळे हळद लागलेल्या नवऱ्याप्रमाणेच हळद लागलेल्या इन्सुलीतील सुर्याची सुद्धा चांदी झालेली आहे.
गाडी तपासणी करणाऱ्या आरटीओ कार्यालयाशी कोणताही संबंध नसताना देखील नोकरी करून लुटालूट करून अधिकारी जेवढे कमावतात त्यापेक्षा जास्त संपत्ती पैसे गोळा करणाऱ्या हळदीच्या सुर्याकडे आहे. ऐषआरामात जीवन जगतो आहे. ना टॅक्स ना कुठली धाड पडण्याची भीती त्यामुळे सुर्याचं जीवन म्हणजे राणीच्या बागेतील वाघापेक्षाही मजेशीर,आरामदायी आहे. राणीच्या बागेतील वाघ निदान पिंजऱ्यात असतो, पण इन्सुलीतील राणीच्या बागेतील सुर्या मात्र सुशेगाद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा