You are currently viewing सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सायबर गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कणकवली येथे जनजागृती शिबिर

        सिंधुदुर्ग 

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर करताना विद्यार्थ्यांनी सतर्कता बाळगावी. अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश तसेच ऑनलाइन व्यवहारांमधील फसवणुकीपासून सावध राहावे. त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित जनजागृती शिबिरात करण्यात आले.

            महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ नोव्हेंबर रोजी विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे सायबर गुन्हेगारी व अंमली पदार्थांविषयी जागरूकता या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

            या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

            यावेळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीच्या विविध प्रकारांची माहिती दिली. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, ऑनलाइन व्यवहारांमधील संभाव्य फसवणुकीचे प्रकार, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी आवश्यक असलेली सतर्कता याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

            जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी अंमली पदार्थांचे सेवन आणि गैरवापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले. वैद्यकीय कारणांशिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा मादक पदार्थ म्हणून वापर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांचे व्यसन ही गंभीर सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या असून, त्यामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य, शिक्षण, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. या व्यसनामुळे व्यक्तीबरोबरच कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. योग्य शिक्षण, जनजागृती, कौटुंबिक सहकार्य आणि वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून व्यसनावर मात करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.

            यावेळी त्यांनी नालसा यांच्या ‘DAWN’ (अंमली पदार्थ-मुक्त भारतासाठी अंमली पदार्थ जागरूकता आणि कल्याण मार्गदर्शन) योजना, २०२५ तसेच अंमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कायदेविषयक सहाय्य आणि मार्गदर्शनाची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक अच्युत वनवे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा