सांगली / प्रदीप जोशी :
भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच, नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे येथे आयोजित संविधान जनजागृती व नशामुक्ती जनजागृती पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पदयात्रेच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी एस.टी. स्टँड परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नशामुक्त भारत अभियान व मादक पदार्थ सेवन प्रतिबंधकामी जनजागृती या अनुषंगाने नशामुक्त भारत अभियानाची सामूहिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पदयात्रेस हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दिनेश पाटील, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, समाज भूषण पुरस्कार प्राप्त अशोक पवार, डॉ. नितीन गोंधळी, विठ्ठलराव काळे, पारमित धम्मकिर्ती, शशिकांत माने यांच्यासह समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, विविध महामंडळे इ. शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विविध शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत प्रतिवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस. टी. स्टँड परिसर येथून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका इमारत, सिटी पोस्ट ऑफिस मार्गे निघून स्टेशन चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ तसेच नशामुक्तीचा संदेश देणारा चित्ररथ सहभागी झाला होता. नशामुक्ती प्रचार व प्रसिध्दी अनुषंगाने नशामुक्त भारत अभियान पोर्टलवरील साहित्याचा वापर करून निर्मल हॉस्पिटल, व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मिरज आणि सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव, ता. मिरज या व्यसनमुक्ती केंद्रांच्या सहकार्याने पदयात्रेमध्ये चित्ररथाद्वारे प्रबोधन करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनीही हातात नशामुक्तीविषयक पोस्टर्स घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि नशामुक्तीचा संदेश देणारी ही रॅली उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.
संविधान रॅलीमध्ये सिटी हायस्कूल सांगली, पटवर्धन हायस्कूल, राणी सरस्वती कन्या शाळा, कै. रा. वि. भिडे मुकबधीर शाळा मिरज, कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली, बॅ. नाथ पै. स्कुल ऑफ नर्सिंग कुडाळ, सिंधुदूर्ग, सहाय्यक सेवाभावी संस्था समर्थ व्यसन मुक्ती केंद्र कुपवाड, गणपतराव आरवाडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगली, अजिंक्य फाऊंडेशन विशेष मुलांची शाळा कुपवाड आदि शाळांमधील जवळपास 500 विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान जनजागृती व नशामुक्ती जनजागृतीसाठी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.
दरम्यान, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयीन स्तरावरही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. तसेच, संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच नशामुक्तीची शपथ घेण्यात येवून संविधान दिन समाज कल्याण कार्यालयाकडून उत्साहाने साजरा करण्यात आला.
