You are currently viewing बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषदेत ६०० महिलांचा सहभाग; सहा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषदेत ६०० महिलांचा सहभाग; सहा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘बुवाबाजीविरोधी महिला राज्य परिषद २०२६’ उत्साहात पार पडली. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून सुमारे ६०० महिला प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिषदेत सहभाग घेतला. बुवाबाजी, अंधश्रद्धा, महिलांचे शोषण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार या विषयांवर परिषदेत विचारमंथन झाले. प्रख्यात कवयित्री नीरजा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. धर्माच्या राजकारणामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नुकसान होत असल्याचे सांगून त्यांनी समाजपरिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर असल्याचे मत व्यक्त केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे होते. उद्घाटनाची सुरुवात अनोख्या प्रतीकात्मक कृतीने झाली. नीरजा आणि अन्य मान्यवरांनी अंधश्रद्धेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या भारतीय महिलेच्या पिंजऱ्याची एकेक कडी सोडवून तिची प्रतीकात्मक मुक्तता केली. त्याच कड्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रतीकात्मक बेड्या बनून भोंदूबुवासमोर पडतात आणि त्याला तुरुंगात जावे लागते, असा या संकल्पनेमागील संदेश होता.

 

नीरजा यांनी १९६०-७० च्या दशकातील सामाजिक परिस्थितीचा दाखला दिला. त्या काळात माणसे अधिक चिकित्सक वृत्तीची होती. चंद्रावर माणूस गेल्यानंतर संकष्टीचा उपवास सोडून देणाऱ्या वृद्धाही होत्या. मात्र, आता प्रश्न विचारणे अवघड झाले असून भोंदूबुवा-बाबांकडे जाणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांनी कर्मकांड आणि दैववादावर विश्वास न ठेवता मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर समाजात वावरावे आणि महाराष्ट्राचे पुरोगामित्व जपावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विविध उपक्रमांची आणि त्यातून साध्य झालेल्या कामाची माहिती देणारी लघुपटिका दाखवण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात संजय बनसोडे यांनी भोंदूबुवांकडून उच्चशिक्षित व्यक्तींचीही फसवणूक होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. महिला आणि युवतींनी हा लढा व्यापक करून शोषणमुक्त आणि समतायुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष शामराव पाटील यांना डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे डी.लिट. पदवी प्रदान करण्यात येणार असल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अंधश्रद्धेविरोधातील कार्याचे कौतुक केले. अंकशास्त्रासारख्या छद्मविज्ञानावर टीका करताना त्यांनी सोशल मीडियावर अंधश्रद्धेविरोधात भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींना होणाऱ्या ट्रोलिंगकडेही लक्ष वेधले. या सत्राचे सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. प्रियंका सवाखंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य कार्यवाह ॲड. रंजना गवांदे यांनी प्रास्ताविक केले, तर महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह गायत्री आडे यांनी आभार मानले.

 

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर आणि डॉ. अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन भोंदूबाबांकडून होणाऱ्या शोषणाचे त्यांनी मानसशास्त्रीय विश्लेषण केले. महिलांनी मनुस्मृतीने लादलेल्या अन्यायकारक बेड्या तोडून विवेक आणि तर्काच्या आधारावर वाटचाल करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. पीडितांच्या पुनर्वसनासाठी समितीने सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन कविता मते यांनी केले. तिसऱ्या सत्रात ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या परिसंवादात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे आणि गौरी जाधव यांनी तरुणाईच्या दृष्टिकोनातून मते मांडली. महिलांना अपमानित करणारी डाकीण प्रथा, ऑनलाइन माध्यमांतून होणारी फसवणूक आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे होणारे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण या विषयांवर चर्चा झाली. या परिसंवादाचे प्रास्ताविक यश सूर्यवंशी यांनी केले, तर इरा बालगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

समारोप सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांनी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अंधश्रद्धाविषयक आशयाबाबत कलाकार आणि प्रेक्षक या दोघांनीही सजग राहण्याची गरज व्यक्त केली. महिलांनी असुरक्षितता, अस्वस्थता आणि भीतीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामना करावा. पुरुषप्रधान मानसिकता बदलून समानतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी राज्यभर राबवण्यात येत असलेल्या बुवाबाजीविरोधी अभियानाचा आढावा घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन रुक्साना मुल्ला यांनी केले, तर यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले. समारोप सत्रात सहा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम, २०१३ या कायद्याची त्वरित नियमावली तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. देशातील विविध राज्यांमध्ये घडणाऱ्या अंधश्रद्धांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी अशाच प्रकारचा कायदा लागू करावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरले. बुवाबाजी आणि भोंदूगिरीतून होणाऱ्या शोषणाची प्रकरणे पोलीस व शासकीय यंत्रणांनी संवेदनशीलतेने हाताळून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. भोंदूबुवा, बाबा आणि माता यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीची तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याचा ठरावही मंजूर झाला. जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र आणि देशातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा अतिभव्य स्वरूपात न करता मर्यादित स्वरूपात आयोजित करावा आणि त्यावरील खर्चाचा उर्वरित निधी दुष्काळ निवारणाच्या मूलभूत कामांसाठी वापरावा, असा सहावा ठराव मंजूर करण्यात आला. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने परिषदेची सांगता झाली.

 

या राज्यस्तरीय परिषदेच्या आयोजनात यशवंतराव चव्हाण सेंटरने महत्त्वाची भूमिका बजावली. सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, महिला विभागाचे प्रमुख प्रशांत ईखार, शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे, तसेच सेंटरच्या मिनल सावंत, वंदना वाळिंजकर, सुकेशनी मर्चंडे आणि मनीषा खिल्लारे यांनी आयोजन व व्यवस्थापनात विशेष योगदान दिले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य व मुंबई शाखेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे परिषदेचे यशस्वी आयोजन शक्य झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा