You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील परळ येथील ऐतिहासिक निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी जाहीर मागणी संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आली. भारतीय संविधान दिनानिमित्त जनहित फाउंडेशन व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिन व संविधान सन्मान पदवी २०२६ हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. संविधान स्तंभ, बी.आय.टी. चाळ क्रमांक ९, परळ येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन संविधान अभ्यासक, पर्यावरणप्रेमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रा. अक्षय आंबेडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कवी, साहित्यिक, लेखक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ॲड. सोपान बुडवाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कवी, साहित्यिक, लेखक व फिल्म संसार बोर्डाचे माजी सदस्य विलास खानोलकर आणि मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष व पत्रकार मुकुंद कांबळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले.

 

कार्यक्रमातून भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी ज्योती वाघ, विलास देवळेकर, मोहन जाधव, संतोष खरोटमोल, अनिल साळवी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी संविधानविषयक कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. गजानन नरवाडे यांनी बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. शशिकांत सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. या साहित्यिक आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

 

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून मोहन जाधव, ॲड. सोपान बुडवाडकर, डॉ. प्रभाकर कांबळे, मीनाक्षी अहिरे, श्याम जाधव, डॉ. संतोष कांबळे, ॲड. आदिती गायकवाड, संतोष खरोटमोल, दिलीप कांबळे, सुवर्णा बामणे, विजय केदासे, अमेय भोसले, वैशाली कांबळे, डॉ. भरत खांडेकर, गिरीश शहा आणि संतोष भोईर यांनी सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार सुरज भोईर यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. दैनिक युवक आधार या वृत्तपत्राच्या मुख्य संपादक भारती संतोष आमले यांचाही या उपक्रमात सहभाग होता.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. आदिती गायकवाड यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाचे जतन करून त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणे, ही केवळ ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाची बाब नाही, तर भावी पिढ्यांना संविधाननिर्मितीच्या प्रेरणादायी इतिहासाशी जोडण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या संविधान गौरव दिनाच्या सोहळ्यातून देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा