अनुवादित साहित्य गटातून जयराम धोंगडे यांच्या अनुवादित ग्रंथाचा गौरव
नांदेड : नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२६’ साठी अनुवादित साहित्य गटातून नांदेड येथील साहित्यिक व अनुवादक जयराम नारायण धोंगडे यांनी अनुवादित केलेल्या ‘झुंज कॅन्सरशी’ या ग्रंथाची निवड झाली आहे.
यशोदा हॉस्पिटल, हैदराबाद येथील ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ तथा रोबोटिक सर्जन डॉ. सचिन मर्दा यांच्या I Am Unstoppable या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘झुंज कॅन्सरशी’ हा ग्रंथ होय. कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांना जगण्याची उमेद, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देणारा या पुस्तकाचा आशय मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम जयराम धोंगडे यांनी अनुवादाच्या माध्यमातून केले आहे.
या पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे संयोजक चुडाराम बल्हारपुरे यांनी निवड झालेल्या सर्व साहित्यिकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
जयराम धोंगडे यांच्या या साहित्यिक यशाबद्दल साहित्यिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
