You are currently viewing विमानसेवे मुळे पर्यटक येतील,पर्यटनपूरक व्यवसायासाठी जिल्ह्यातील तरुणांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नीतेश राणे

विमानसेवे मुळे पर्यटक येतील,पर्यटनपूरक व्यवसायासाठी जिल्ह्यातील तरुणांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नीतेश राणे

*विमानसेवे मुळे पर्यटक येतील,पर्यटनपूरक व्यवसायासाठी जिल्ह्यातील तरुणांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नीतेश राणे*

*चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचे १८ कोटींचे आर्थिक पाठबळ!

*दीड महिन्यात इंडिगोची विमानसेवा सुरू होणार.

*१६ नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग चिपी–नवी मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

चिपी विमानतळावरील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने १८ कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ दिले आहे. नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यामुळे विमानतळ आता नियमित विमानसेवेसाठी सज्ज झाला आहे. फ्लाय ९१ विमानसेवेनंतर येत्या दीड महिन्याच्या कालावधीत इंडिगोची विमानसेवाही सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस कायमस्वरूपी सुरू राहाणार आहे.आता पर्यटक येतील त्यांना सेवा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवतींनी पुढाकार घ्यावा. रोजगाराची नवनवीन संधी या विमान सेवेमुळे निर्माण होती त्याची संधी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
१६ नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग चिपी–नवी मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार आल्याबद्दल बोलताना विमानतळाच्या मंत्री राणे म्हणाले, चिपी विमानतळावर यापूर्वी नाईट लँडिंगची सुविधा नव्हती. तसेच आवश्यक विजिबिलिटी आणि तांत्रिक सुविधांचा अभाव असल्यामुळे विमान कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक नव्हत्या. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राज्य सरकारने १८ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे विमानतळाच्या संचालनातील महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. आता चिपी विमानतळ कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दीड महिन्यात इंडिगोची विमानसेवा सुरू होणार. असल्याचे ही यावेळी त्यांनी सांगितले.
चिपी विमानतळ सुरू होणे म्हणजे केवळ विमानसेवा सुरू होणे नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार आणि पर्यटनाच्या नव्या संधींचे दालन खुले होणे आहे. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्याची जबाबदारी आता स्थानिकांनी स्वीकारली पाहिजे. पर्यटकांना विमानतळावरून गावागावांत जाण्यासाठी पर्यटन वाहने, चांगली हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर पर्यटनपूरक सुविधा आवश्यक असतील. या संधींचा लाभ जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी घ्यावा, असे आवाहन राणे यांनी केले.
पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ देण्यास सिंधुदुर्ग जिल्हा बँक तयार आहे. एखाद्या तरुणाला पाच पर्यटन वाहने सुरू करायची असतील, तर त्याने जिल्हा बँकेशी संपर्क साधावा. योग्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत बँक सहकार्य करेल. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनाही या उपक्रमासाठी सोबत घेतले आहे. त्यामुळे तरुणांनी सुरुवातीच्या भांडवलाची चिंता न करता पुढाकार घ्यावा. त्यांच्या धाडसाला आर्थिक बळ देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमानतळाच्या परिसरात तसेच जिल्ह्यात पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिकांनी आतापासून नियोजन करावे. चांगली हॉटेल्स, दर्जेदार खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पर्यटन वाहतूक सेवा सुरू करता येतील. मात्र, हे व्यवसाय करताना अतिक्रमण न करता नियोजनबद्ध पद्धतीने सुविधा उभाराव्यात. आपणच या संधींचा लाभ घेतला नाही, तर उद्या गोव्यातील व्यावसायिक येऊन येथे व्यवसाय सुरू करतील. त्यानंतर स्थानिकांनी आंदोलन करून उपयोग होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याची संकल्पना होती. चिपी ते नवी मुंबई नियमित विमानसेवा सुरू झाल्यानंतर या संकल्पनेला मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी पर्यटनाशी संबंधित व्यवसायांचा अभ्यास करावा, माहिती घ्यावी आणि धाडसाने पुढे यावे. त्यांच्या प्रयत्नांना आर्थिक व प्रशासकीय पाठबळ देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नीतेश राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा