सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बालकांमधील न्यूमोनिया प्रतिबंधासाठी जनजागृती
SAANS अभियानांतर्गत महिलांना मार्गदर्शन; बालमृत्यू रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन
सावंतवाडी :
जागतिक बालदिनाचे औचित्य साधून SAANS (न्यूमोनिया यशस्वीपणे निष्फळ करण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कृती) अभियानांतर्गत १४ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण देसाई यांनी उपस्थित महिलांना लहान मुलांची घ्यावयाची काळजी, न्यूमोनियाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच न्यूमोनियाची लागण झाल्यास घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण देसाई, डॉ. ओंकार कोल्हे, परिसेविका इन्चार्ज तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.
हे अभियान १२ नोव्हेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयसीटीसी समुपदेशक सुनील सोनसुरकर यांनी केले.
