You are currently viewing स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये विटा शहर देशात प्रथम 

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये विटा शहर देशात प्रथम 

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

स्वच्छतेचा ध्यास, नियोजनबद्ध व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धनाची बांधिलकी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यांच्या बळावर विटा शहराने देशाच्या स्वच्छतेच्या नकाशावर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनखाली नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती,नगरसेवक, मुख्याधिकारी अधिकारी व कर्मचारी, स्वच्छतादूत यांनी अत्यंत उत्कृष्ट काम करत स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्या गटात स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांक मिळवून विटा शहराने राष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजविला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथील ऐतिहासिक राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा शहराचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी स्विकारला. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तींच्या हस्ते झालेला हा गौरव विटा शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या अभिमानात भर घालणारा ठरला आहे.

विटा नगरपरिषदेने स्वच्छतेला केवळ दैनंदिन काम न मानता शहराच्या सर्वांगीण विकासाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा केंद्रबिंदू बनविले. स्वच्छतेच्या प्रत्येक घटकाचे सूक्ष्म नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी, नियमित देखरेख आणि नागरिकांचा सहभाग या चतुःसूत्रीवर आधारित कामकाजामुळे विटा शहराने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शहरातील प्रत्येक घरातून दररोज ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याची व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. घर टू घर कचरा संकलनापासून त्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, व्यापारी पेठा, बाजारपेठा, रहिवासी भाग आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता केली जाते. गटारांची साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची देखभाल आणि स्वच्छता व्यवस्थेवर सातत्याने लक्ष दिले जाते.

प्लास्टिकमुक्त शहर निर्माण करण्यासाठी विटा नगरपरिषदेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुनर्वापरयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. कचरा कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रण करणे या 3R संकल्पनेच्या माध्यमातून कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला चालना दिली जात आहे.

शहरातील तलाव, ओढे आणि जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येतात. सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, परिसराचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण, हरित क्षेत्र निर्मिती आणि प्रदूषण नियंत्रण यांसारख्या उपक्रमांतून शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार रुजविण्यासाठी विविध स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांना सहभागी करून स्वच्छतेची लोकचळवळ उभी केली जात आहे.

विटा शहराला मिळालेला हा राष्ट्रीय बहुमान म्हणजे केवळ एका संस्थेचा पुरस्कार नाही, तर शहरासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान आहे. पहाटेपासून शहरातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी घाम गाळणारे स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यापारी आणि जागरूक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याचाही या यशात महत्त्वाचा वाटा आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मधील देशातील प्रथम क्रमांक आणि राष्ट्रपती भवनातील सन्मान यामुळे विटा शहराच्या विकासप्रवासाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य, गुणवत्तापूर्ण कामकाज, आधुनिक कचरा व्यवस्थापन आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधल्यास लहान शहरदेखील देशपातळीवर आपला ठसा उमटवू शकते, हे विटा शहराने दाखवून दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा