You are currently viewing जीवनशैलीत बदल करून आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो – मानशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये 

जीवनशैलीत बदल करून आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो – मानशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये 

सिंधूमित्र प्रतिष्ठान आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी कोजागिरी निमित्त आयोजित केला कार्यक्रम

सावंतवाडी

सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येतात. यावेळी कोजागिरी पौर्णिमा सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबवून मोटिवेशनल व्याख्यान आयोजित करून साजरी करण्यात आली. प्रत्येकाच्या जीवनातील दुःख रुपी अंध:कार नष्ट होऊन, पोर्णिमेसारखा निश्चल, स्वच्छ सुखरूपी प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात यावा, या उद्देशाने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे “मोटिवेशनल व्याख्यान” आयोजित करण्यात आले.

यावेळी मानसशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ताणतणावांना समोरे जात असतो. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी अचानक ब्लँक झाल्याप्रमाणे वाटते किंवा संकट आल्यास अचानक मोठ्यांना सुद्धा काहीही सुचेनासे होते. यातून शांतपणे कसा मार्ग काढावा ? याबाबतचे मार्गदर्शन मानसशास्त्राच्या आधारे पद्मजा आंबिये यांनी केले. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून संकटसमयी मानसिक संतुलन कसे राखावे ? आपण जीवनामध्ये अनेक ताणतणावांना समोर जात असतो, त्यामुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या विविध परिणामांचा देखील उहापोह त्यांनी केला. आजकाल समाजामध्ये सर्रास आढळणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, हृदय विकार अशा अनेक आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आपल्या ताणतणावयुक्त जीवनशैलीशी असतो, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करून ध्यानधारणा, हलके शारीरिक व्यायाम, स्वतःला आवश्यक वेळ देणे, समाजाभिमुखता या गोष्टी अवश्य कराव्यात, असे त्यांनी सुचविले. मानसशास्त्रीय ट्रिक्स च्या आधारे, त्यांनी अनेक बाबींचा उलगडा सहज सोप्या पद्धतीने करून दाखविला. सकारात्मक जीवन पद्धतीचे परिणाम आपल्या मनासह शरीरावर देखील सकारात्मकच होतात, हे सुद्धा त्यांनी अनेक उदाहरणांच्या आधारे समजावून सांगितले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मजा आंबिये यांचे स्वागत डॉ. दीपा पिरणकर यांनी केले. तर आभार डॉ. मुग्धा ठाकरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन करून सकारात्मक कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली, असा अभिप्राय उपस्थितांनी देऊन आयोजनाबद्दल प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले व चांगल्या मार्गदर्शनाबद्दल पद्मजा आंबिये यांचे देखील कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + thirteen =