You are currently viewing शेतकरी पुरस्कारांच्या अर्जांना २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

शेतकरी पुरस्कारांच्या अर्जांना २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

शेतकरी पुरस्कारांच्या अर्जांना २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकरी गटांसह वैयक्तिक शेतकऱ्यांना दिलासा

सिंधुदुर्ग :

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या शेतकरी गट आणि वैयक्तिक शेतकरी पुरस्कारांच्या अर्जांसाठी २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मुदतवाढ मिळावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा तसेच नाविन्यपूर्ण व प्रयोगशील शेती करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी ही पुरस्कार योजना राबविण्यात येते. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर होती. त्यानंतर ती २६ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, शेतीकामातील व्यस्तता आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.
या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पाच शेतकरी गटांना, तर संपूर्ण जिल्ह्यातील दहा वैयक्तिक शेतकऱ्यांना पुरस्कार व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अर्जांची छाननी आणि अंतिम निवड संबंधित समितीमार्फत केली जाणार आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटांनी आणि नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज २० नोव्हेंबरपूर्वी सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुदतवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि आत्माच्या प्रकल्प संचालक सौ. नाईकनवरे यांचे उमेश सावंत यांनी किसान मोर्चाच्या वतीने आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा