You are currently viewing भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी

मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी

        सिंधुदुर्ग

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी शासनाच्या वतीने मोफत पूर्वप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दिनांक १४ ते २३ डिसेंबर २०२६ या कालावधीत एसएसबी (Service Selection Board) कोर्स क्रमांक ६८ आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी दिनांक ८ डिसेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal मधील Resources – PCTC Nashik – SSB 68 या पर्यायातून प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी. सर्व परिशिष्टे पूर्ण भरून मुलाखतीच्या वेळी सोबत आणावीत. संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रवेशपत्राचाही वापर करता येईल.

प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रता :

खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.

1. CDSE कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हींसेस एक्झामिनेशन अथवा NDA नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन अथवा AFCAT परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी पात्र असणे आवश्यक आहे.

2. एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे आवश्यक आहे.

3. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असणे आवश्यक आहे.

4. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असणे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असणे आवश्यक आहे.

मुलाखतीस उपस्थित राहताना संबंधित पात्रतेचे प्रमाणपत्र किंवा कॉल लेटर सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथील प्रभारी अधिकारी यांच्याशी कार्यालयीन वेळेत ई-मेल training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ९१५६०७३३०६ वर संपर्क साधावा.

जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या मोफत प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा