ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध : मंत्री नितेश राणे
१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन
सिंधुदुर्ग, दि.२१ : राज्य शासन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी तब्बल १४.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे काम उर्वरीत २३ महिन्यांत कोणत्याही तक्रारीविना अतिशय दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच, यापुढेही भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, सदानंद राणे, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, प्रथमेश सावंत आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, तत्कालीन मंत्री भाईसाहेब सावंत यांच्यापासून ते माजी पालकमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर यांच्यासह सावंतवाडी पंचायत समितीच्या तत्कालीन सर्व सभापती उपसभापती व पदाधिकाऱ्यांनी या इमारतीसाठी मोठा पाठपुरावा केला. या आराखड्यात फर्निचरचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यास तोही तातडीने मंजूर केला जाईल, जेणेकरून काम कोठेही थांबणार नाही. २४ महिन्यांपैकी एक महिना उलटला असून आता उर्वरीत २३ महिन्यांत ही वास्तू दिमाखात उभी राहावी आणि तिच्या उद्घाटनाला खासदार नारायणराव राणे यांना आपण निमंत्रित करू, असे ते म्हणाले. जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे सावट असून प्रशासन ‘ट्रिगर वन’ अंतर्गत काम करत आहे, अशा वेळी पंचायत समितीची यंत्रणा बळकट होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत मोठी गुंतवणूक येत आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. येथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील. या भागात अधिक रोजगार आणण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
आराखड्यात बदल न करता काम वेळेत पूर्ण करा : आ. दीपक केसरकर
आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एखादा आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यात वारंवार बदल करू नयेत, अन्यथा वाढीव निधीच्या मंजुरीअभावी काम रेंगाळते. सावंतवाडी पंचायत समितीचे काम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच ही इमारत पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे. उर्वरीत इमारतींची कामेही जिल्हा नियोजनमधून मार्गी लावली जातील. खासदार नारायणराव राणे यांचे या मतदारसंघावर नेहमीच प्रेम राहिले असून पालकमंत्री नितेश राणे हे देखील अत्यंत सकारात्मकतेने काम करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी १४ कोटींचा भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदारांचे आभार मानत या इमारतीतून विकासाची गंगा प्रवाहित होईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी पंचायत समिती ही प्रशासन आणि लाभार्थी यांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे आभार गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी मानले.