सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे 13 व 14 जुलै रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली द्वारा सन 2025-26 या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या 65 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल (सबज्युनिअर/ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहे. या स्पर्धा 15 वर्षा खालील मुले (सब ज्युनियर) व 17 वर्षा खालील मुले व मुली (ज्युनिअर) अशा वयोगटाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू हा 15 वर्षाखालील मुले (सबज्युनिअर) दिनांक 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षांखालील मुले व मुली (ज्युनिअर) दिनांक 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा माहे 13 व 14 जुलै 2026 रोजी होणार, असून जिल्ह्यातील शाळांनी नोंद घ्यावी तसेच जे संघ सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व शाळांनी/संघानी सहभागापुर्वी https://www.subrotocup.in/register या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे.
राष्ट्रीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, आधारकार्ड व पासपोर्ट (सर्व मूळ प्रतीत) असणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळून आल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडू अधिक वयाचा नसल्याची संपूर्ण खात्री संबंधित शाळा/ विद्यालयाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी करावी. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
