You are currently viewing सगळ्यांचं मन जपणारा माणूस
Oplus_16908288

सगळ्यांचं मन जपणारा माणूस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लेख*

 

*सगळ्यांचं मन जपणारा माणूस*

 

(समर्पण : मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना समर्पित)

 

काही माणसं असतात, ती जन्मालाच दुसऱ्यांसाठी आलेली असतात. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणारी. स्वतः आतून तुटलेली असतानाही दुसऱ्याला सावरून धरणारी.

 

तो हसतो, म्हणून सगळ्यांना वाटतं तो सुखी आहे. तो सगळ्यांना धीर देतो, म्हणून सगळ्यांना वाटतं त्याला कधी धिराची गरजच लागत नाही. तो सगळ्यांचं ऐकून घेतो, म्हणून सगळ्यांना वाटतं त्याच्या मनात कधीच काही साचत नाही. पण खरं तर तोच सगळ्यात जास्त एकटा असतो.

 

तो दिव्यासारखा असतो. स्वतः जळून दुसऱ्यांना उजेड देतो. लोक त्या उजेडात आपला रस्ता शोधतात, पण त्या दिव्याखाली किती अंधार दाटला आहे, हे कुणीच पाहत नाही. त्याच्या ज्वाळेकडे सगळे पाहतात, पण त्याची वात कधी वितळत चालली आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही.

 

सगळ्यांचं मन जपणारा माणूस कधीच कुणाला नकार देत नाही. कुणी रडत आलं तर खांदा देतो, कुणी रागावलं तर समजून घेतो, कुणी दुखावलं तर माफ करून टाकतो. त्याला वाटतं, आपण थोडं दुखावलो तरी चालेल, पण समोरच्याचं मन दुखावता कामा नये. आणि याच चांगुलपणात तो हळूहळू स्वतःला विसरून जातो.

 

मग एक दिवस असा येतो, जेव्हा त्याचं मन भरून येतं. त्याला वाटतं, आज कुणीतरी आपल्याला विचारावं, अरे तू बरा आहेस ना. आज कुणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणावं, तू एकटा नाहीस, मी आहे. पण आजूबाजूला पाहतो, तर सगळे आपापल्या आनंदात निघून गेलेले असतात. ज्यांना त्याने सावरलं होतं, तेच आता त्याला विसरलेले असतात.

 

कारण जगाला नेहमी हसणारे चेहरे आवडतात. रडणारे खांदे कुणालाच नको असतात. जो माणूस सगळ्यांना आधार देतो, त्यालाच आधाराची गरज असू शकते, हे जगाला पटतच नाही. लोक त्याला दगड समजतात. पण त्यांना कळत नाही, दगडालाही आतून पाझर फुटतो.

 

खरं तर अशा माणसाला फार काही नको असतं. मोठं कौतुक नको, मोठी भेट नको. फक्त एका मायेचा शब्द हवा असतो. तू थकलास असशील, थोडा विसाव. तुझंही मन आहे, तेही कधीतरी बोलू दे. एवढं ऐकलं तरी त्याच्या डोळ्यातलं साचलेलं पाणी ओघळून जातं.

 

म्हणून जर तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस असेल, जो नेहमी तुमचं मन जपतो, तुमच्यासाठी धावून येतो, तुमचं दुःख आपलं मानतो, तर त्याला गृहीत धरू नका. त्याला कधीतरी विचारा, तू कसा आहेस. कारण जो सगळ्यांचं मन जपतो, त्याचं मन जपणं हीच खरी माणुसकी असते.

 

शेवटी एवढंच खरं आहे, सगळ्यांना उजेड देणारा दिवा जेव्हा विझतो, तेव्हाच लोकांना त्याची किंमत कळते. तो विझण्याआधी त्याला जपा.

 

@इंदुमाय – श्री प्रभाकर भामरे मेहरगावकर, धुळे.

प्रतिक्रिया व्यक्त करा