You are currently viewing देखावा

देखावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देखावा*

 

अरे, कशाला खोट्या प्रेमाचा

देखावा दाखवायचा?

मेल्यावर फोटोला उगाचच

चंदनाचा हार लावायचा.

 

सारे काही सुखासुखी असताना

दोन घास पोटाला देत नाही,

जवळ बसून कधी आई-वडिलांची

विचारपूस करत नाही.

 

वृद्धत्वाचा त्रास नको म्हणून

आई-वडिलांना आश्रमात पाठवायचं,

इच्छा नसताना घरादारावर

आई-वडिलांची पुण्याई लिहायची.

 

मरणकळा सोसणारे मायबाप

एकटेच, एकाएकी जगतात,

मेल्यावरही खांदा द्यायला

शेजार-पाजारचे परके कोणीतरी असतात.

 

उगाच खोट्या श्रद्धेने

श्राद्ध घालायचं,

भावनिक होऊन फोटोसमोर

नतमस्तक व्हायचं.

 

श्राद्ध घालून आत्मा कधी

तृप्त झालाय का?

पंचपक्वान्नांच्या घासाला

कावळा कधी शिवलाय का?

 

उगाच छतावर जाऊन

उन्हातान्हात बसायचं,

काव-काव करून

कावळ्यांना बोलवायचं.

 

अरे… जिवंतपणीच

आई-वडिलांची सेवा

हीच पंढरीची वारी असते,

त्यांच्या रूपानेच घरात चंद्रभागा दिसते.

 

आई-वडील म्हणजे

स्वर्गानंदापेक्षा कमी नाही,

त्यांच्या सेवेसारखं दुसरं

भागवत कुठेच नाही.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा