You are currently viewing आळंदी देवाची येथे साहित्यनिष्ठांची मांदियाळी विशेष सोहळा 

आळंदी देवाची येथे साहित्यनिष्ठांची मांदियाळी विशेष सोहळा 

आळंदी / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवाची येथे गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ‘साहित्यनिष्ठांची मांदियाळी’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणींना उजाळा देतानाच आगामी शंभराव्या संमेलनाची नांदी या कार्यक्रमातून केली जाणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन, विचारमंथन, चक्री भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या सोहळ्याचे आकर्षण असेल, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या महासचिव प्रा. स्वाती चाटे व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी मसापचे जिल्हा प्रमुख राजन लाखे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व समन्वयक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम फ्रूटवाले धर्मशाळेत होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत उल्हासदादा पवार असतील. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून कार्यक्रमस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. दुपारी १२ ते १.१५ या वेळेत ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर चक्री भजन सादर करतील.

दुपारी २ वाजता ‘तीर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी आजच्या पिढीतील संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे योगदान’ या विषयावर विचारमंथन होईल. डॉ. संजय उपाध्ये अध्यक्षस्थानी असतील. ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, सचिन परब आणि ह.भ.प. बापूसाहेब मोरे सहभागी होतील. दुपारी ३.३० वाजता अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि डॉ. समीरा गुजर यांचा ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सायंकाळी पाच वाजता समारोप होणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा