*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कसं असतं ना…….*
कसं असतं ना
विशी बाविशीचं ते वय
मनाचा अथांग सागर
अन् भावभावनांचे
अनंत वलय……
तो भेटूच नये वाटतांना
नजर त्याच्याच वाटेवर
भिरभिरत असते…
तो दिसूच नये वाटतं
तेव्हा दृष्टी त्यालाच
शोधत बसते…..
जवळपास अवतीभवती
कुठेच मोरपीस नसते
पण तनामनावर हवीशी
हुळहूळ जाणवते…
शब्दातील अर्थ
आत नाहीच शिरत….
पुस्तक जवळ धरलेलं
पण कशाचं ,नाही कळत….
मागील पानावरील गुलाब
चित्रातूनही गंध उधळतं…
झोकदार अक्षरातील
त्याचं नाव न बघताही
भुरळ घालतं….
झाडाच्या सावलीत
बुंध्याजवळ खेटून बसताना
त्याच्या कानाशी
केलेली कुजबूज
त्याला कळतच नाही…
मलाही कळलेलीच नसते….
जाणवतात केवळ स्पंदने
आणि हळूवार होणारे स्पर्श….
एका स्वप्नील जगात
मन रमलेले असते….
आता इतक्या वर्षांनी
कदाचितकधी तू
समोर आलास तर…
बघशील का तसाच
चष्म्याआडून
मिश्मिल हसत …
मीही प्रतिसाद देईन
त्या क्षणापुरतं
हसत हसत……
कारण…..
मन तसं असतं ना……..!!
°°°°°°°°°°°🩷°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार@✍️
