You are currently viewing १८ ऑक्टोबरला सावंतवाडीत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

१८ ऑक्टोबरला सावंतवाडीत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

कै. सरोज सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीचे आयोजन; १६ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणीची मुदत

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी कै. सरोज सूर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासकिलवाडा येथील राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता करण्यात येईल.

सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुक्ताई ॲकेडमी गेली दहा वर्षे अशा स्पर्धांचे आयोजन करत आहे. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमधील मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत खेळविण्यात येईल. प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना रोख रक्कम, मेडल, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील तीन मुलींना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी नावनोंदणी शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबरपर्यंत करायची आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर (मो. ८००७३८२७८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुक्ताई ॲकेडमीच्या सरचिटणीस सौ. स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचे पहिले राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेसंदर्भात आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा