You are currently viewing दहा लाखांची वॉशिंग मशीन तीन महिन्यांत बंद; दुरुस्तीसाठी अडीच लाखांचा खर्च!
Oplus_16908288

दहा लाखांची वॉशिंग मशीन तीन महिन्यांत बंद; दुरुस्तीसाठी अडीच लाखांचा खर्च!

एक वर्षाची वॉरंटी असतानाही दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्याची वेळ; सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला प्रश्न, सभापती प्रितेश राऊळ यांचे चौकशीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन महिन्यांपूर्वी १० लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली वॉशिंग मशीन सध्या बंद पडली आहे. एक वर्षाची वॉरंटी असतानाही या मशीनच्या दुरुस्तीसाठी अडीच लाख रुपये खर्च का केला जात आहे, असा प्रश्न जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश आरोग्य समितीचे सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, समिती सदस्य सावी लोके, रुपेश पावसकर, अवनी तेली, सुनील पारकर, यशा साळगावकर, संतोष पारकर, आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.

मागील दोन आरोग्य समिती सभांमध्ये गाजत असलेल्या वॉशिंग मशीन खरेदी प्रकरणाबाबत आज सदस्य रुपेश पावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला. खरेदी करण्यात आलेल्या वॉशिंग मशीनची दुरुस्ती झाली का, असा सवाल त्यांनी केला. यावेळी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या मशीनच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती दिली.

खरेदी करण्यात आलेल्या वॉशिंग मशीनला एक वर्षाची वॉरंटी असतानाही दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च का केले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित करत ही मशीन चांगल्या कंपनीची खरेदी करण्यात आलेली नाही किंवा कमी दर्जाची मशीन खरेदी करण्यात आली आहे, अशी शंका रुपेश पावसकर यांनी व्यक्त केली. यामध्ये शासनाच्या पैशाचा अपव्यय झाल्याचे दिसून येत असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभापती प्रतीश राऊळ यांनी चौकशीचे आदेश देत तात्काळ अहवाल सादर करण्याची सूचना केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी निधी देऊनही अद्याप बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार केले नसल्याने दुरुस्तीच्या कामाला विलंब होत आहे. याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बांधकाम विभागाने तात्काळ अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचना सभापतींनी केली.

जिल्ह्यातील अनेक स्मशानभूमींच्या जमिनींचे सातबारा उतारे जमीनमालकांच्या नावावर आहेत. त्यामुळे अशा जमिनी ग्रामपंचायतींच्या नावावर करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना सदस्यांनी सभेत केली.

यावेळी सभेत साथरोगांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही सभेत करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा