शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन; स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्यासह अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी
कुडाळ : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करून प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
राज्यात सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून, या भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शिक्षक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. परजिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात नियुक्त होतात आणि काही वर्षांनंतर आपल्या मूळ जिल्ह्यात परत गेल्याने स्थानिक पातळीवर शिक्षकांची पदे पुन्हा रिक्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तसेच स्थानिक भूमिपुत्र शिक्षक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
तसेच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ वर्गातील अध्यापनासाठी वापरला जाणे आवश्यक असल्याचे प्राजक्त चव्हाण यांनी शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यासोबतच कला शिक्षक आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे सर्व शाळांमध्ये भरण्यात यावीत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्यांना आणि सर्वांगीण विकासाला अधिक वाव मिळेल, अशी मागणी करण्यात आली.
बांधकाम कामगारांच्या मुलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र व हजेरी प्रमाणपत्राचे छापील नमुने सर्व प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
सदर निवेदनावर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ शेरा मारून ते आपल्या स्वीय सहाय्यकांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केले. या सर्व विषयांबाबत आपणही आग्रही असून, संबंधित मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी दिल्याचे प्राजक्त चव्हाण यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ लिपिक पालकर, ठुंबरे आदी उपस्थित होते.
