दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला दिले बळ
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी विविध संघटना व संस्थांनी पुढाकार घेत बंधारे बांधण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत व्हाइस ऑफ मीडिया, दोडामार्गच्या वतीने आंबडगाव येथे श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला.
आंबडगाव गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत हा बंधारा बांधण्यात आला असून, पावसाचे तसेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जलसंधारणासाठी उपयोग व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ बातम्या न करता सामाजिक प्रश्नांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत पत्रकार संघटनेने दिलेला हा संदेश विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला चालना देतानाच आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी अशा छोट्या-छोट्या जलसंधारणाच्या कामांची मोठी गरज आहे. प्रशासनाच्या आवाहनाला संघटनांनी प्रतिसाद दिल्यास ग्रामीण भागात जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमात व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी (आपा) राणे, ज्येष्ठ पत्रकार शिरीष नाईक, प्रमोद गवस, गोविंद शिरसाट, प्रथमेश नाईक, शुभम गवस, नारायण नाईक आदी पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला.
पत्रकारिता केवळ बातम्यांपुरती मर्यादित न ठेवता समाजहिताच्या उपक्रमांतही सक्रिय सहभाग घेण्याचा ‘व्हाइस ऑफ मीडिया’चा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
