You are currently viewing वन्यप्राण्यांसाठी खाद्यझाडांची लागवड कधी होणार?

वन्यप्राण्यांसाठी खाद्यझाडांची लागवड कधी होणार?

वन्यप्राण्यांसाठी खाद्यझाडांची लागवड कधी होणार?;

दोडामार्गात शेतकऱ्याचा पाच वर्षांचा नारळ वन्यप्राण्यांनी केला उद्ध्वस्त

वनक्षेत्रात साग, बांबू, किंजळसह मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड; मात्र वन्यप्राण्यांना आवश्यक खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या वनस्पतींच्या लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप

दोडामार्ग :

तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दींना लागून हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. गेल्या सुमारे तीस वर्षांत या वनक्षेत्रातील जुनी झाडे काढून शासनामार्फत साग, बांबू, किंजळ यांसारख्या विविध जंगली झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. मात्र, या जंगलात वन्यप्राण्यांना आवश्यक नैसर्गिक खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या वनस्पतींची पुरेशा प्रमाणात लागवड झाली नसल्याने वन्यप्राणी अन्नाच्या शोधात शेतवाड्यांकडे वळत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, पाच वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात लावलेले आणि आता सहाव्या वर्षात पदार्पण केलेले एका शेतकऱ्याच्या व्यक्तिगत मालकीचे नारळाचे झाड गेल्या रात्री वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले. पाच वर्षे जपलेले हे झाड वन्यप्राण्यांनी पूर्णपणे नष्ट केल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा फोटो काढताना वन्यजीव व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न मनात आल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितले. केंद्रीय वनमंत्र्यांपासून वनरक्षकांपर्यंत वन्यजीवांसाठी जंगलनिर्मितीचे काम केले जाते. मात्र, तृणभक्षी वन्यप्राण्यांना आवश्यक असलेले खाद्य, फळे व इतर नैसर्गिक वनस्पती उपलब्ध होतील, अशा प्रकारची लागवड वनक्षेत्रात अधिक प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
“शासनाने सर्वप्रथम आपल्या मालकीच्या वनजमिनीवर वन्यप्राण्यांना आवश्यक खाद्य उपलब्ध होईल, अशा प्रकारची लागवड करावी. जंगलात पुरेसे खाद्य उपलब्ध झाल्यास वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांकडे वळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी वनविभागाच्या नियमांचे उल्लंघन करून झाड तोडल्यास कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र, वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या फळझाडांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानभरपाई आणि न्याय मिळणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वन्यप्राण्यांसाठी योग्य अधिवास व खाद्यव्यवस्था निर्माण करण्याबरोबरच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती व फळझाडांच्या नुकसानीबाबत प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा