*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*म्हणे नावात…*
म्हणे नावात ठेवलंय् काय
मोठा नामाचा महिमा हाय..
अहो, आंब्याला म्हणतात आंबा
नाही दिसत डोळ्यापुढे कांदा
चिंच म्हणताच दिसते चिंच
नाही दिसत बाभुळ उंच
म्हणे नावात ठेवलंय् काय
मोठा नामाचा महिमा हाय..
दोडके गिलके ठेवलीत नावे
कांदे बटाटे त्याला म्हणावे
आले म्हणताच तिखट वास
नसले जवळ तरीही भास
मिरची लागता डोळ्यात पाणी
लगी येते हो आणिबाणी
लवंगी म्हणताच ठरेना पाय..
मोठा नामाचा महिमा हाय..
वड म्हणताच दिसतो वड
नाही दिसत केळीचा घड
पिंपळ म्हणताच दिसे आकाश
सळसळ पानांची वाजते खास
कदंब म्हणताच आठवे कान्हा
गाय म्हणताच दुधाचा पान्हा
गाई वासरे घेऊन जाय..
मोठा नामाचा महिमा हाय…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
