कोल्हापूर (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
दक्षिण भारत जैन सभेच्या ‘प्रथमाचार्य श्री शांतिसागर शैक्षणिक दत्तक पालक शिष्यवृत्ती योजनेस’ डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रु. १० लाखांचे बृहत्दान देण्यात आले. दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन नुकतेच कोल्हापूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी मंत्री आमदार श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी सभेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून, सभेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतलेल्या शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठी आपल्या पिताश्रींच्या, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने रु. १० लाखांचे बृहत्दान देण्याची घोषणा केली होती.
या घोषणेची पूर्तता करताना डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देणगीचा धनादेश डॉ. संजय डी. पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री. संजय शेटे आणि मुख्यमहामंत्री श्री. अनिल बागणे यांच्याकडे सुपूर्द केला. या बृहत्दातृत्वाबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने डॉ. संजय डी. पाटील यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
श्री. अनिल बागणे यांनी डॉ. संजय डी. पाटील यांना दक्षिण भारत जैन सभेच्या शैक्षणिक दत्तक पालक शिष्यवृत्ती योजनेसह विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच, या बृहत्दातृत्वाबद्दल त्यांनी पाटील परिवाराचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले.
यावेळी श्री. संजय शेटे यांनी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा व सामाजिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत, पाटील परिवाराने जपलेल्या सामाजिक बांधिलकीची आठवण करून दिली. शिक्षण, सामाजिक कार्य आणि समाजातील गरजू घटकांना सक्षम करण्याची डॉ. डी. वाय. पाटील यांची परंपरा पुढे नेत माजी मंत्री, आमदार श्री. सतेज पाटील व डॉ. संजय डी. पाटील यांनी सभेच्या उपक्रमांना दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी संघटनमंत्री श्री. शशिकांत राजोबा, शिष्यवृत्ती समितीचे चेअरमन श्री. सुनील पाटील, एन. जे. पाटील बोर्डिंगचे चेअरमन श्री. विजयकुमार शेट्टी, जॉ. सेक्रेटरी श्री. राजू वळिवडे, जॉ. सुपरिटेंडेंट श्री. दीपक मगदूम, संचालक श्री. अनिल पाटील, श्री. विशाल शेटे, श्री. माधव उपाध्ये, जैन चेंबर ऑफ कॉमर्स संचालक श्री. धनंजय दुग्गे आदी उपस्थित होते.
दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दलाच्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरालाही माजी मंत्री, आमदार श्री. सतेज पाटील यांच्याकडून दरवर्षी भरघोस सहकार्य मिळत असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांची विशेष आस्था आहे. त्यामुळे शैक्षणिक दत्तक पालक योजनेसाठीचे हे रु. १० लाखांचे योगदान हे केवळ आर्थिक मदत नसून शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला दिलेले भक्कम पाठबळ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
