*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*धावू नको रे…*
धावू नको रे वेड्यासारखा शत्रू लागले पाठी सहा
धाप लागली थांब जरासा मागे वळूनी थोडे पहा…
संतापाचा अतिरेक नी संशयाचे भुत मनी
तूच मालक तूच चालक स्वामी नाही तुझा कुणी..
तरी बेचैनी अस्वस्थ असा का काय टोचते सदा तुला
सुखात राहणे शिक माणसा झुलव सारखा मनी
झुला..
झाले गेले विसरून जावे हिशोब त्याचा ठेवू नये
भूतकाळीची भूते गाडूनी काढून टाका सारी भये..
वैरभाव हा सदा जाळतो पोखरतो तो हृदयांतरी
जळता निखारा फेकून द्यावा मनातून हो खूप दुरी..
आपले आपण स्वस्थ असावे नाक कुठेही खुपसू नका
कोण करतो काय तो करतो भोगेल करता तोच
चुका..
शांत असावे समाधान हे साधन तृप्तीचे असते
शांतसंयमी घरातच हो नेहमी लक्ष्मी ती वसते..
आपण सुखी तर घर सुखी हो उगाच भणभण करु नका
वसवस करुनी काय फायदा माफ कराव्या साऱ्या चुका..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
