रक्षा नदीत विसर्जित न करता शेतात जतन; स्मृती जपण्यासाठी आंबा, चिक्कूची रोपे लावली
येडशी : धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे संजय शिवाजी खोबरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनिष्ट रूढी-परंपरेला फाटा देत सामाजिक बदलाचा आदर्श घालून दिला. रक्षा कोणत्याही नदी अथवा जलस्रोतामध्ये विसर्जित न करता वडिलोपार्जित शेतजमिनीत जतन करून त्यावर आंबा व चिक्कू या फळझाडांची रोपे लावण्यात आली. या उपक्रमातून कै. संजय खोबरे यांच्या स्मृती जतन करण्याबरोबरच वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कै. संजय शिवाजी खोबरे यांचे दि. ३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी ग्रामसेवक म्हणून कार्य केले होते. ग्रामविकास, शेतकऱ्यांना मदत तसेच सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. समाजसेवा करताना त्यांनी परिवर्तनवादी विचार स्वीकारले होते.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही खोबरे कुटुंबीयांनी सामाजिक बदलाच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला. येडशी येथील वडिलोपार्जित जमिनीमध्ये रक्षा जतन करून त्यावर आंबा व चिक्कूची रोपे लावण्यात आली. त्यामुळे कै. संजय खोबरे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन होण्याबरोबरच भविष्यात या झाडांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी जिवंत राहणार आहेत.
‘रक्षा पाण्यात विसर्जित न करता जतन करावी’ हा संदेश
समाजातील काही अनिष्ट चालीरीती व परंपरा सामाजिक बदलाच्या आड येतात. अशा परंपरांना बाजूला सारून जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन आणि मानवी मूल्यांचे जतन करण्याचा विचार खोबरे कुटुंबीयांनी कृतीतून मांडला. रक्षा पाण्यात विसर्जित करण्याऐवजी ती जतन करून वृक्षारोपण करण्याचा उपक्रम पर्यावरणपूरक असून समाजासाठी दिशादर्शक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ यांनी व्यक्त केले. त्यांनी खोबरे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
अग्निसंस्काराच्या वेळी कै. संजय खोबरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, यासाठी निसर्गातील सर्व शक्तींना प्रार्थना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर आणि जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे यांनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली वाहिली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनेही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेस परिसरातील नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
