You are currently viewing शिक्षक विध्यार्थ्यांच्या स्वप्नाना बळ देतात आमदार सुहास बाबर यांचे मत 

शिक्षक विध्यार्थ्यांच्या स्वप्नाना बळ देतात आमदार सुहास बाबर यांचे मत 

विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

शिक्षक विदयार्थ्यांना ज्ञानदान करून त्याना जीवनात सक्षम बनवतात. त्यांच्या भावी स्वप्नाना बळ देतात. त्यामुळे शिक्षकांचे समाजातील स्थान अनन्यसाधारण आहे. असे मत आमदार सुहास बाबर यांनी व्यक्त केले. येथे कार्यसम्राट आमदार स्व. अनिल बाबर आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले,” विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञान, संस्कार आणि समर्पणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजेच समाजाच्या भविष्याचा सन्मान होय. शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात. अशा शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान करणे होय. ”

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या वतीने कार्यसम्राट आमदार स्व. अनिलभाऊ बाबर आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, समर्पित आणि प्रेरणादायी कार्य करणारे श्री. सुरेश कोळी आणि श्रीमती यमुना चव्हाण यांना कार्यसम्राट आमदार स्व. अनिलभाऊ बाबर आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानचिन्ह व गौरवपत्र देत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

आमदार सुहास बाबर म्हणाले, “शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा कर्तव्यनिष्ठ शिक्षकांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!”

शिक्षण क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव केल्याने इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची जोपासना होणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी, शाळेच्या विकासासाठी तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यामुळे विटा शहरातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याची परंपरा अधिक दृढ झाली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

या सोहळ्यास आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, शिक्षण सभापती डॉ. लिला भिंगारदेवे, शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे , आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, बांधकाम सभापती श्रीकांत साळुंखे,पाणीपुरवठा सभापती सुरेश पवार, महिला बालकल्याण सभापती अपर्णा पाटील, नगरसेवक विनोद गुळवणी, वैभव म्हेत्रे,उज्वला पाटील, सारिका सपकाळ,अविनाश शितोळे,विशाल तारळेकर, संजय भिंगारदेवे, रामचंद्र भिंगारदेवे,यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका, विटा नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, निवृत्त शिक्षक, मान्यवर, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा