मिरज / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे म्हणजे २२ मीटर रुंदीचा रस्ता होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारीसह अन्य तांत्रिक बाबींची पुर्तता होणे आवश्यक असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्धवट स्थितीत असलेला रस्ता महापालिकेकडे हस्तांतरण करुन जबाबदारी झटकण्याचा घाट घातला आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम पुर्ण होईपर्यंत रस्ता हस्तांतरणाला मिरज सुधार समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे.
याबाबतचे निवेदन मिरज सुधार समितीच्या वतीने महापौर धीरज सुर्यवंशी आणि अतिरिक्त राहूल रोकडे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, शहरातील महात्मा फुले चौकापासून ते तानंग फाट्यापर्यंतचा सुमारे ११ किमीचा छत्रपती शिवाजी महाराज अतिशय महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता होण्यासाठी मिरज सुधार समिती गेल्या पाच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण हटविणे, शहरी बस स्थानक व मुख्य बस स्थानकाची भिंती मागे सरकून घेणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारीसह अन्य कामे प्रलंबित आहेत. अवघ्या वर्षभरातच रस्त्याचे चाळण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यात मुरुम भरल्याने मातीचा चिखल होऊन अपघात घडत आहेत.
अशी वस्तुस्थिती असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रस्ता महापालिकेला हस्तांतरण करुन जबाबदारी झटकण्याचा खटाटोप सुरु केला आहे. म्हणून अंदाजपत्रकाप्रमाणे काम पुर्ण होईपर्यंत हा रस्ता महापालिकेने ताब्यात घेऊन नये, अशी मागणी मिरज सुधार समितीने महापौर धीरज सुर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, सुरेश झेंडे, अमीर डांगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
